हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपीस आठ वर्षांनी अटक
हत्येनंतर मुंबईतून पळून गेल्यानंतर गुजरातमध्ये वास्तव्यास होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – हत्येच्य गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस आठ वर्षांनी शिवाजीनगर पोलिसांच्या विशेष पथकाने गुजरात येथून अटक केली. सलवातुला अब्दुल कयुम शेख असे या ३० वर्षांच्या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येनंतर मुंबईतून पळून गेल्यानंतर सलवातुला शेख हा काही वर्षांपासून गुजरातमध्ये वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गेल्या काही महिन्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेतर्ंगत आतापर्यंत अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील बहुतांश आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर पळून गेले होते. त्यामुळे त्यांना फेरअटक करुन पुन्हा लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरु करण्यात आली होती. ही शोधमोहीम सुरु असताना शिवाजीनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने सलवातुला शेख या वॉण्टेड आरोपीस अटक केली. फेब्रुवारी २०१८ साली गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात एका व्यक्तीची हत्या झाली होती.
याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत सलवातुला याचे नाव समोर आले होते, मात्र हत्येनंतर तो पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. गेल्या आठ वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सलवातुला हा गुजरात राज्यात टायर पंचरच्या दुकानात काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदूलाल पाटील, रमेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार महेश घारे, पोलीस शिपाई रोहित बाढ, राहुल सुतार, शंकर तिटकारे, सुरज डांगे, संदीप मोहिते, पोलीस शिपाई आकाश शेडगे आणि रोहित पाटील आदी पथकाला गुजरात येथे पाठविण्यात आले होते.
या पथकाने मोबाईल क्रमांकाच्या सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण करुन भरुच शहरातून सलवातुला याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.