ठाण्यात वास्तव्यास असलेल्या वॉण्टेड आरोपीस २० वर्षांनी अटक

जामिनावर बाहेर येताच पळून गेला होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – ठाण्यातील वैतीवाडी, रामचंद्रनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका वॉण्टेड आरोपीस वीस वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी फेरअटक केली. राजेश अर्जुन हातळकर असे या आरोपीचे नाव असून तो जामिनावर जेलमधॅन बाहेर येताच पळून गेला होता. गेल्या वीस वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.

२००६ साली राजेशला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी एका गुन्ह्यांत अटक केली होती. याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना त्याने किल्ला कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला होता. मात्र जामिनवर बाहेर येताच तो पळून गेला होता. खटल्याच्या सुनावणीसाठी तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करुन त्याचा शोध घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते.

या आदेशानंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या घरासह नातेवाईकांकडे राजेशचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. तो त्याचे मूळ घर सोडून इतर ठिकाणी वास्तव्यास गेला होता. त्यात तो स्वतचे अस्तित्व लपवून राहत असल्याने त्याचा शोध घेण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना राजेश हा ठाण्यातील वैतीवाडी, रामचंद्रनगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती युनिट सातच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे, धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव परबळकर, अरुण सावंत, सहाय्यक फौजदार दिपक पवार, पोलीस हवालदार दिपक पवार, जाधव, विलास राऊत, विकास होनमाने, महिला पोलीस शिपाई सविता शिंदे आदी पथकाने वैतीवाडी, रामचंद्रनगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.

शुक्रवारी रामचंद्रनगर परिसरात राजेश हा संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तोच वीस वर्षांपासून वॉण्टेड असलेला आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्याला ताब्यात घेऊन नंतर युनिट सातच्या कार्यालयात आणण्यात आले. याच गुन्ह्यांत नंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page