बोरिवली पोलीस ठाण्याच्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला अटक

गुन्ह्यांत मदतीसह अटक न करण्यासाठी लाचेची मागणी करणे महागात पडले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – बोरिवली पोलीस ठाण्याच्या एका लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला मुुंबई युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. ज्ञानेश्‍वर मोहन परांडे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्याच्यावर गुन्ह्यांत मदतीसह अटक न करण्यासाठी एका वयोवृद्धाकडे दिड लाखांची मागणी करुन एक लाख तीस हजाराची लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात झालेल्या या कारवाईने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अटकेनंतर ज्ञानेश्‍वर परांडे यांना मंगळवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.

यातील तक्रारदार ६५ वर्षांचे वयोवृद्ध असून त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही बहिणीविरुद्ध अलीकडेच बोरिवली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर परांडे यांच्याकडे होता. गुन्ह्यांचा तपास करताना त्यांची तक्रारदार आरोपीला चौकशीसाठी बोलाविले होते. त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांत मदत करणे तसेच या गुन्ह्यांत त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही बहिणींना अटक न करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामोबदल्यात त्यांनी त्यांच्याकडे दिड लाखांची मागणी केली होती. ही लाच दिली नाहीतर त्यांच्यावर कारवाईची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम देण्याचे आश्‍वासन देऊन त्यांच्याविरुद्ध मंबइ्र युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

२९ सप्टेंबरला ही तक्रार प्राप्त होताच दुसर्‍या दिवशी संबंधित अधिकार्‍यांनी तक्रारीची शहानिशा केली होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर परांडे यांनी दिड लाखांऐवजी एक लाख तीस हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप नावडकर, पोलीस निरीक्षक विठ्ठल पिसाळ, सहाय्यक फौजदार पोळे, फंटागरे, तेली, पोलीस हवालदार रावराणे, पोलीस शिपाई परब, महिला पोलीस शिपाई बाबर, पोलीस शिपाई रेडेकर, साबळे आदी पथकाने सोमवारी बोरिवली पोलीस ठाण्यात सापळा लावला होता.

यावेळी तक्रारदाराकडून एक लाख तीस हजाराची लाचेची रक्कम घेताना ज्ञानेश्‍वर परांडे यांना या पथकाने रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईनंतर त्यांच्या घरी पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवईचा तपशील समजू शकला नाही. अटकेनंतर मंगळवरी दुपारी ज्ञानेश्‍वर परांडे यांना विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. गुन्ह्यांत मदतीसह अटक न करण्यासाठी लाचेची मागणी करणे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर परांडे यांना चांगलेच महागात पडले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page