कॉलेजसाठी प्लॉट देतो असे सांगून संस्थेच्या मालकाची फसवणुक

७० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी प्लॉटमालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – कॉलेजसाठी प्लॉट देतो असे सांगून एका संस्थेच्या मालकाची त्याच्याच परिचित आरोपीने सुमारे ७० लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्लॉट मालक सुरेश लक्ष्मण वटाकट्टील याच्याविरुद्ध वनराई पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्लॉटची मालकी हक्क वडिलांच्या नावावर असताना सुरेशने तो प्लॉट त्याच्या मालकीचा असल्याचे सांगून खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन ही फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चिंतामनी सुदर्शन पांडे हे जोगेश्‍वरीतील रामवाडी, पारसनगर परिसरात राहतात. त्यांची सुदर्शन रामकिसुन शिक्षण संस्था नावाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजी हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, डिग्री कॉलेजची सुरुवात केली होती. याच संस्थेत ते सध्या सचिव म्हणून काम करतात. गोरेगाव येथे त्यांच्या संस्थेचे कॉलेज सुरु असून ती जागा त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. कॉलेजला जागा कमी पडत असल्याने ते दुसर्‍या जागेचा शोध घेत होते. कॉलेजच्या बाजूलाच एक मोठा प्लॉट होता. तो प्लॉट विकत घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्याचा मालक सुरेश वटाकट्टील होता. चार वर्षांपूर्वी त्यांनी त्याच्यासोबत प्लॉट खरेदी-विक्रीबाबत बोलणी केली होती. यावेळी त्याने साडेसात कोटींना प्लॉट विक्रीची तयारी दर्शविली होती.

सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२६ या कालावधीत त्यांनी त्यांना टप्याटप्याने ४५ लाख रुपये दिले होते. ही रक्कम चेक आणि आरटीजीएसद्वारे देण्यात आली होती. याच दरम्यान चिंतामणी पांडे यांनी पुण्याच्या एका फायनान्स कंपनीकडे पाच कोटीच्या कर्जासाठी अर्ज केला होता. यावेळी त्यांनी प्लॉटचे काही कागदपत्रे त्यांना दिली होती. या कागदपांची पाहणी केली असता तो प्लॉट सुरेशचे वडिल लक्ष्मण वटाकट्टील यांच्या मालकीची असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे फायनान्स कंपनीकडून त्यांचे कर्ज मंजूर होत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला प्लॉट स्वतच्या नावावर करुन घेण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने त्यांना प्लॉट नावावर करुन देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितली. याच दरम्यान त्यांनी त्यांना प्लॉट खरेदी-विक्रीचे एमओयू बनविण्यास सांगितले,

मात्र तो एमओयूसाठी त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून आणखीन पंधरा लाख रुपये घेतले होते. मात्र त्याने एमओयू बनविला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्याने जागा नावावर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार करु नये. आपण लवकरच पुढील प्रक्रिया सुरु करु असे सांगितले. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून आणखीन पंधरा लाख रुपये घेतले होते. मात्र काही महिने उलटूनही त्यांच्यात ठरल्याप्रमाणे करार नाही किंेवा सुरेशने प्लॉट त्याच्या नावावर करुन घेतला नव्हता.

विचारणा केल्यानंतर तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. नंतर त्याने त्यांचा मोबाईल ब्लॉक केला होता. वडिलांच्या नावावर असलेला प्लॉट स्वतच्या नावावर नसताना तो प्लॉट स्वतच्या नावावर असल्याची बतावणी करुन सुरेश वटाकट्टीलने प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन चितामणी पांडे यांची ७० लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुरेश वटाकट्टील याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page