एपीके फाईलद्वारे गंडा घालणार्‍या सॉफ्टवेअर डेव्हल्परला अटक

देशभरात १०७४ गुन्ह्यांत पावणेसोळा कोटीची घोटाळा झाल्याचे उघडकीस

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – बोगस एपीके फाईलद्वारे अनेकांना गंडा घालणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखेच्या प्रॉपटी सेलच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाशे केला. याच गुन्ह्यांत मध्यप्रदेशातील रहिवाशी असलेल्या एका ३६ वर्षांच्या सॉफ्टवेअर डेव्हपरला पोलिसांनी अटक केली. या टोळीने २८०५ एपीके फाईलद्वारे देशभरातील ९६७२ लोकांना सुमारे पावणेकोटी रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यात महाराष्ट्रातील आठ आणि मुंबईतील पाच गुन्ह्यांचा सहभाग आहे. अटकेनंतर आरोपीला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यातील ७२ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार भायखळा परिसरात राहतात. १३ ऑगस्टला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तो एका नामांकित बँकेचा मॅनेजर दिनेशकुमार असल्याचे सांगून तुम्हाला सिनिअर सिटीजन कार्ड बनवून देतो असे सांगितले. त्यांचा विश्‍वास संपादन करुन त्याने त्यांना व्हॉटअपवर सिनिअर सिटीजन कार्ड व्हेरीफिकेशन नावाने एक एपीके फाईल पाठवली होती. त्यांनी ती फाईल ओपन करुन त्यांची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची डिटेल्स भरली होती. त्यानंतर त्यांच्या बॅक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाले होते.

अज्ञात सायबर ठगाने त्यांच्या खात्यातून ५ लाख ६२ हजाराची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच या वयोवृद्धाने भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेच्या प्रॉपटी सेलकडे वर्ग झाला होता. या गुन्ह्यांचा तपास हाती घेताच पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. तपासात या गुन्ह्यांतील आरोपी मध्यप्रदेशात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे, प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, प्रकाश गवळी, पोलीस अंमलदार अमीत करपाते, विश्‍वनाथ पापेळ, योगेश गाढवे, निधी नाईक, पश्‍चिम सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मयुर थोरात यांनी मध्यप्रदेशातून ३६ वर्षांच्या सॉफ्टवेअर डेव्हलरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांचा त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

त्याच्या कार्यालयात पोलिसांनी छापा टाकून एक पेनड्राईव्ह, एक सीपीयु, तीन हार्डडिस्क, एक वायफाय राऊटर, तीन मोबाईल जप्त केले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. चौकशीत आरोपी वेगवेगळ्या सर्व्हर सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून विविध कंपन्याचे सर्व्हर वापरत होता. त्याने आतापर्यंत २८०५ एपीके फाईल बनविले होते. या एपीके फाईल त्याने काही सायबर गुन्ह्यांतील मुख्य आरोपींना विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

२८०५ एपीके फाईलद्वारे भारतातील एकूण ९ हजार ६७३ लोकांची फसवणुक झाली आहे. त्यापैकी सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर भारतात १०७४, महाराष्ट्रात १४३, मुंबईत ३६ तक्रारी दाखल आहेत. त्यात एकूण १५ कोटी ७५ लाखांची फसवणुक झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.् त्यापैकी भारतात ८८, महाराष्ट्र ८ आणि मुंबईत ५ गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page