स्पायडरमॅन स्टाईलने इमारतीवरुन चढून फ्लॅटमध्ये प्रवेश करुन चोरी
चोरीच्या मुद्देमालासह २७ वर्षांच्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – स्पायडरमॅन स्टाईलने बांबूच्या परांचीच्या सहाय्याने इमारतीवरुन चढून एका फ्लॅटमध्ये चोरी करुन पळून गेलेल्या २७ वर्षांच्या आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. बहरुल नूरइस्लाम तरफदार असे या आरोपी नाव असून तो उत्तर मुंबईत भंगार वेचण्याचे काम करत होता. त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
जलुभा सरुपसिंह जडेजा हे मालाडच्या दत्त मंदिर रोड, प्रथमेश एव्हेनू अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा इमिटेशनचा व्यवसाय आहे. त्यांच्या इमारतीचे रिनोव्हेशनचे काम सुरु आहे. त्यामुळे इमारतीभोवती बांबूची परांची बांधण्यात आली होती. अनेकदा ते रात्रीच्या वेळेस हॉल आणि बेडरुमची खिडकी उघडी ठेवत होते. २८ सप्टेबरला त्यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. त्याने बेडरुमच्या लाकडी सेल्फवर ठेवलेली तीन लाखांची सोन्याची रुद्राक्षाची सोन्याची चैन आणि साडेसहा हजाराची कॅश असा ३ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी ती माहिती तिच्या पतीला सांगितली.
त्यानंतर त्यांनी दिडोंशी पोलिसांना चोरीची तक्रार केली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना अज्ञात व्यक्तीने इमारतीभोवती बांधण्यात आलेल्या बांबूच्या परांचीच्या सहाय्याने स्पायडरमॅन स्टाईलने खिडकीतून फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. चोरीनंतर तो त्याच प्रकारे फ्लॅटमधून खाली उतरुन पळून गेला होता. याप्रकरणी जलुभा जडेजा यांच्या तक्रारीवरुन दिडोंशी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु केला होता.
या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, साहय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद सुर्वे, सहाय्यक फौजदार अनिल शिंदे, पोलीस हवालदार नवनाथ बोराटे, अमीत पंडित, निलेश सांबरेकर, पोलीस शिपाई तामकर, दिपक गायकवाड, उमेश बडगौरे आदी पथकाने बहरुल तरफदार या २७ वर्षांच्या संशयिताला मिरारोड येथून ताब्यात घेतले होते.
तपासात बहरुल हा मिरारोड येथे राहत असून बोरिवली, कांदिवली, मालाड परिसरात कचरा वेचण्याचे काम करत होता. कचरा वेचताना त्याने तक्रारदार व्यापार्याच्या घरी रेकी केली होती. या रेकीनंतर त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील कोर्टात हजर करण्यात आले होते. आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक परिसरात कचरा वेचणारे झुबेर अन्सारी आणि शहराफत शेख यांनी मदत केल्याचे बोलले जाते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बहरुल याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.