अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्यासाठी दोन कोटीची खंडणीची मागणी

खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाला दोन कोटीची खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा प्रकार प्रभादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका समाजसेवाकासह त्याच्या सहकार्‍याविरुद्ध दादर पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राघवेंद्र कोलगी आणि संतोष गुप्ता अशी या दोघांची नावे असून यातील राघवेंद्र हा समाजसेवक आहे. इमारत पुर्नविकासाच्या विरोधात तक्रार करुन तक्रार मागे घेण्याासाठी त्याने दोन कोटीची मागणी केली होती. त्याला अपक्ष म्हणून निवडणुक लढवायची होती, त्यासाठी पैशांची गरज असल्याने त्याने कंपनीच्या विरोधात महानगरपालिकेत तक्रार करुन खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तशीच कबुलीच आरोपीने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तिजारतअली जुम्मन खान हे वयोवृद्ध तक्रारदार नरिमन पॉईट येथे राहत असून राशनल आर्टस ऑफ प्रेस लिमिटेड या कंपनीत कायदेशीर व्यवस्थापक म्हणून काम करतात. या कंपनीत आरिफ फजलानी आणि आसिफ फजलानी हे संचालक म्हणून काम करतात. ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असून कंपनी जागा खरेदी-विक्री करणे, जागा भाडेतत्त्वावर देणे आदी काम करते. आरिफ यांची फजलानी ग्रुप ऑफ कंपनीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची अन्य एक कंपनी असून त्यांच्या कंपनीचे दहा ते बारा सिस्टर कंपन्या आहेत. २००६ साली कंपनीने प्रभादेवी येथील आप्पासाहेब मराठे मार्गावरील एक इमारत खरेदी केली होती.

ही इमारत जुनी असल्याने कंपनीने तिथे पुर्नविकासाचे काम सुरु केले होते. त्यासाठी कंपनीने महानगरपालिकेकडून आवश्यक सर्व परवानग्या घेतल्या होत्या. त्यानंतर तिथे कंपनीने पुर्नविकासाचे काम सुरु केले होते. मार्च २०२६ रोजी बांधकामाविरोधात राघवेंद्र कोलगी या व्यक्तीने मनपाकडे तक्रार केली होती. त्यात त्याने ही जागा इंडस्ट्रिल झोनमध्ये येत आहेत. त्यामुळै कंपनीला पुर्नविकासाची दिलेली परवानगी रद्द करावी अशी विनंती केली होती. याबाबतची सुनावणी सुरु असल्याने कंपनीने पुर्नविकासाचे काम बंद केले होते. याच दरम्यान तिथे एका व्यक्तीने पाहणी करुन बांधकाम का बंद आहे अशी विचारणा केली. त्याने पुर्नविकासाचे काम सुरु करायचे असल्यास मला संपर्क साधा असे सांगून स्वतचा मोबाईल क्रमांक दिला होता.

१७ एप्रिलला तिजारतअली खान यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने स्वतचे नाव राघवेंद्र कोलगी असल्याचे सांगून त्याने त्यांच्या कंपनीविरुद्ध मनपामध्ये तक्रार केल्याचे सांगितले. त्याने तक्रार अर्जाबाबत समोरासमोर बोलू असे सांगून फोन कट केला. दुसर्‍या दिवशी त्याने त्यांना काळबादेवी येथे बोलाविले होते. त्यामुळे ते तिथे गेले होते. यावेळी राघवेंद्रने त्यांच्याशी पुर्नविकासाबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेत त्याने तो समाजसेवक असून त्याला अपक्ष म्हणून निवडणुक लढवायची आहे. त्यासाठी पैशांची गरज असल्याने त्याने ही तक्रार केल्याची कबुली दिली. तक्रार मागे घेण्यासाठी त्याने त्यांच्याकडे दोन कोटीची मागणी केली होती. त्यांच्या कंपनीने बेकायदेशीर मनपाकडून परवानग्या प्राप्त केले आहेत.

याबाबतचे कागदपत्रे माझ्याकडे असून त्याच्या आधारे तुमच्या मालकाला आयुष्यभर जेलमध्ये जावे लागेल. यावेळी तिजारतअली खान यांनी कंपनीने कायदेशीर मार्गाने मनपाकडून परवानगी घेतली असून त्यांना दोन कोटी देणे शक्य नाही असे सांगितले. त्यानंतर राघवेंद्रने त्याची मनपाच्या विविध अधिकार्‍यांशी ओळख असून त्यांच्यासोबत सेटींग आहे. त्यामुळे त्यांना दोन कोटी रुपये द्यावेच लागतील. नाहीतर त्यांना तिथे पुर्नविकासाचे काम करता येणार नाही. कंपनीचे नुकसान होऊन कंपनी बंद पाडू अशी धमकी दिली. या धमकीनंतर त्यांनी कंपनीच्या मालकाशी बोलून पैशांबाबत सांगतो असे सांगून तेथून निघून गेले. घडलेला प्रकार त्यांनी त्यांच्या संचालक मालकांना सांगितला, त्यांनी राघवेंद्रला दोन कोटी रुपये देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी राघवेंद्रला पैसे देण्यास नकार दिला होता.

तरीही तो त्यांना सतत पैशांसाठी कॉल आणि मॅसेज करत होता. पैसे दिले नाहीतर बांधकाम साईटवर गुंड पाठवून नुकसान करण्याची तसेच मालकांना जिवे मारण्याची धमकी देत होता. याच दरम्यान त्याने संतोष गुप्ताच्या मदतीने मनपामध्ये कंपनीच्या विरोधात दुसरी तक्रार केली होती. संबंधित तक्रार अर्ज पाहिल्यानंतर राघवेंद्र आणि संतोषने केलेला तक्रार समान असल्याचे दिसून आले. फक्त नावात बदल होता. त्यामुळे राघवेंद्रनेच संतोषला मनपामध्ये तक्रार करण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. काही दिवसांनी संतोषने त्यांना कॉल करुन त्यांच्याकडे तीस लाखांची खंडणीची मागणी सुरु केली होती.

चौकशीदरम्यान त्यांना राघवेंद्र आणि संतोषने त्यांच्या कंपनीची माहिती काढून, बांधकाम साईटवर जाऊन पाहणी करुन मनपामध्ये तक्रार केली होती. तक्रार मार्ग घेण्यासाठी त्यांच्याकडे दोन कोटी आणि तीस लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर मालकांना जेलमध्ये पाठवून, त्यांना गोळ्या घालू अशी धमकी दिली होती. त्यामुळे मालकाच्या सूचनेनंतर त्यांनी दादर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी राघवेंद्र कोलगी आणि संतोष गुप्ता यांच्याविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page