गिरणी कामगाराच्या म्हाडा फ्लॅटच्या बहाण्याने ३.६३ कोटींना गंडा

फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – दादर येथील नायगावच्या म्हाडा कॉलनीतील बॉम्बे डाईंग गिरणी कामगाराच्या फ्लॅटच्या आमिषाने प्रिटींग व्यावसायिकासह सोळाजणांची एका टोळीने ३ कोटी ६३ लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह सातजणांविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन सोळाजणांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अनिल अरुण माने, संतोष टकले, सुधीर वायंगणकर, शिला धुरी, विलास भालेराव, सिद्धेश जाधव आणि निलेश खाडे अशी या सातजणांची नावे आहेत. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते, त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सुरेश वसंत शिंदे हे व्यावसायिक असून त्यांचा प्रिटींगचा व्यवसाय आहे. गेल्या सोळा वर्षांपासून ते माझगावच्या घोडपदेव परिसरात राहतात. त्यांना त्यांच्या मुलांसाठी फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरमन त्यांची इस्टेट एजंट असलेल्या अनिल मानेशी ओळख झाली होती. त्याच्याकडे संतोष टकले, विकास भालेराव हे काम करत होते. त्यांनी त्यांना अनिल मानेकडे गिरणी कामगारासाठी असलेले बरेच फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून त्यांना स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगितले.

ऑगस्ट २०२४ रोजी सुरेश शिंदे हे त्यांचे चुलत बंधू अजय गंगाराम शिंदे यांच्यासोबत अनिलला भेटण्यासाठी त्याच्या दादर येथील कार्यालयात गेले होते. तिथे त्याने त्यांना दादरच्या नायगाव, बॉम्बे डाईंग मिल, म्हाडा वसाहतीत गिरणी कामगाराचे फ्लॅट असून त्यातील एक फ्लॅट ३५ लाखांमध्ये देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी त्यांना मोठी रक्कम टोकन म्हणून द्यावी लागेल असे सांगितले. याच दरम्यान त्यांनी बँकेतून वीस लाखांचे कर्ज घेतले होते. नोव्हेंबर २०२४ रोजी ते दोघेही पुन्हा अनिलला भेटण्यासाठी तयंच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी दयाराम हंसराज जैस्वाल यांच्याशी ओळख करुन दिली. त्यांच्या मालकीचा तिथे एक फ्लॅट असल्याचे सांगून त्यांना फ्लॅटचे कागदपत्रे दाखविली होती.

दोन महिन्यांत फ्लॅटचा व्यवहार करतो असे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला वीस लाखांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात दयाराम जैस्वाल यांच्या बॉम्बे डाईंग मिल, म्हाडा कॉलनी, इमारत क्रमांक चार/सी, ७११ क्रमांकाच्या फ्लॅटचे कायदेशीर नोटरीकृत एमओयू बनविण्यात आले होते. त्यात त्यांना दोन महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र दोन ते तीन महिने उलटूनही त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. मालक आजारी आहे, ट्रेनची तिकिट मिळत नाही असे आणि वेगवेगळे कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.

मार्च २०२५ रोजी अनिलने त्यांना दोन वेगवेगळे फ्लॅट दाखविले. या दोन्ही फ्लॅटचे एमओयू केले. मात्र या फ्लॅटचाही दिलेल्या मुदतीत ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी फ्लॅटसाठी दिलेल्या वीस लाखांची मागणी सुरु केली होती, मात्र त्याने त्यांना वीस लाख रुपये दिले नाही. त्याने दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आला होता. अनिल माने याने इतर सहा आरोपींच्या मदतीने संगनमत करुन फ्लॅटच्या नावाने त्यांची फसवणुक केली होती. या प्रकारानंतर त्यांनी त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना अनिल मानेसह इतर सहा आरोपींनी अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. फ्लॅटसाठी त्याने आठजणांकडून पैसे घेतले होते, मात्र त्यापैकी कोणालाही त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही.

या सोळाजणांमध्ये सुनिल शिंदे, २२ लाख,गणेश भास्कर कर्ले, मोहन देवराम काळे प्रत्येकी १७ लाख, अजीत रमेश भादवणकर २५ लाख, उषा विनय सोलंकी दहा लाख पूजा ज्योतिबा भादवणकर २४ लाख २५ हजार, अनिता आनंदा भादवणकर ३५ लाख, प्रशांत त्रिंबक २० लाख, रविंद्र यशवंत तांबे २७ लाख, नेत्रप्रभा अनिल शेटले २९ लाख सुधीर शिवराम पालांडे तीस लाख, सुभाष नारायण पवार २६ लाख, प्रशांत जालिंदर चव्हाण १२ लाख, दत्तात्रय नामदेव कदम ३४ लाख ५० हजार आणि अमीत अंकुश घाडीगावकर १५ लाख रुपये आदींचा समावेश आहे. या सर्वांकडून त्यांनी ३ कोटी ६३ लाख ७५ हजार घेतले होते.

मात्र फ्लॅटचा ताबा न देता किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच सुरेश शिंदे यांनी सर्वांच्या वतीने भोईवाडा पोलीस ठाण्यात संबंधित सातही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अनिल माने, संतोष टकले, सुधीर वायंगणकर, शिला धुरी, विलास भालेराव, सिद्धेश जाधव आणि निलेश खाडे या सातही आरोपींविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीविरुद्ध आतापर्यंत सोळाजणांनी तक्रार केली असून आगामी काळात आणखीन काहीजण तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page