बोगस डिस्ट्रिब्युटरशीप निर्माण करुन २.१० कोटीचा आर्थिक घोटाळा
फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या अधिकार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – बोगस सुपर डिस्ट्रीब्युटरशीप निर्माण करुन एका अधिकार्याने कंपनीच्या दोन कोटी दहा लाखांच्या रक्कमेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या अधिकार्यासह त्याची पत्नी आणि ओळखीचा नातेवाईक अशा तिघांविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन कंपनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रहिम अल्लारखाभाई अदमानी, अमिता प्रदीपभाई शर्मा आणि सुरेजा ख्याती जयंतीभाई अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अभिनव राकेश माथुर हे व्यावसायिक असून पवईत परिसरात राहतात. त्यांची एक खाजगी कंपनी असून या कंपनीत ते संचालक म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत कंपनीत इतर चारजण पार्टनर असून तंची नावे अलक नरेश धार्गिया, आशिष आर्या, चिरुथा दलाल आणि विनित खानविलकर अशी आहेत. ही कंपनी ऑनलाईन बँकिगमार्फत लोकांना पैशांचे देवाणघेवाण करण्याचे काम करते. हा व्यवसाय भारतातील बँकिंग व्यवहारापुरतीच मर्यादीत आहे. कंपनीचे ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ असे एकूण चार झोन असून प्रत्येक झोनमध्ये एक झोनल मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना मदतीसाठी दोन डेप्युटी झोनल मॅनेजरची मदत होते. कंपनीकडून एका ऑडिट टिमची नियुक्ती करण्यात आली असून या टिमकडून प्रत्येक झोनमध्ये जाऊन ऑडट केले जाते.
मार्च २०२६ रोजी ऑडिटदरम्यान काही अधिकार्यांना गुजरात कार्यालयात आर्थिक घोटाळा झाल्याचे दिसून आले होते.त्यामुळे डेप्युटी झोनल मॅनेजर अखिल भुरीलाल जैन, सिनिअर रिलेशन मॅनेजर रहिम अदनामी, रिलेशन मॅनेजर लोकेश माणिकचंद जैन, मंगेश सुरेंद्र कनोजिया आदींची चौकशी करण्यात आली होती. त्यात रहिम अदमानीने कंपनीने तयार केलेल्या सुपर डिस्ट्रिब्युटरची नियुक्ती ही आपल्या जवळील ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने करुन त्याच्या खालील कंपनीसोबत व्यवसाय करणार्या खर्या डिस्ट्रीब्युटरची नोंदणी केल्याचे तसेच त्या व्यवसायातून मिळणारे सर्व कमिशन स्वतसह स्वतच्या नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर कंपनीच्या सिस्टीममधील सर्व माहिती तपासण्यात आली होती.
त्यात गुजरात दौर्यावर गेलेल्या ऑडिट टिमला रहिम अदमानीने तयची पत्नी अमिता शर्मा आणि परिचित सुरेजा ख्याती यांच्या मदतीने हा संपूर्ण आर्थिक घोटाळा केल्याचे दिसून आले होते. अशा प्रकारे बोगस सुपर डिस्ट्रिब्युटरशीप निर्माण करुन त्याद्वारे कंपनीकडून मिळणारे २ कोटी १० लाख ९४ हजार ५६५रुपयांची रक्कम रहिमने त्याच्या पत्नी आणि ओळखीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. जानेवारी २०२४ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा संपूर्ण घोटाळा झाला होता.
हा प्रकार उघडकीस येताच ऑडिट टिमने ही माहिती संचालक मंडळाला सादर केली होती. त्याची कंपनीच्या संचालकांनी गंभीर दखल घेतली होती. अखेर अभिनव माथुर यांनी कंपनीच्या मदतीने रहिम अदनानी, अमिता शर्मा आणि सुरेजा ख्याती या तिघांविरुद्ध बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिघांविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून कंपनीच्या दोन कोटी दहा लाखांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिन्ही आरोपींची लवकरच पोलिसाकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.