विविध व्यासाच्या पंधरा लाखांच्या वायरची चोरी करुन पलायन
चोरीचा गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – इमारतीसह फ्लॅटमध्ये विद्युत जोडणीसाठी एका रुममध्ये ठेवण्यात आलेल्या सुमारे पंधरा लाखांच्या विविध व्यासाची वायरची चोरी करणार्या एका मुख्य आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. महेंद्र मानिकचंद जैन असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रभाकर चंद्रकांत दुधभाते हे मूळचे धाराशिवचे रहिवाशी असून विद्युत ठेकेदार आहेत. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील महाकाली गुंफा परिसरात राहतात. मे २०२४ रोजी अंधेरीतील पूनम नगर, जेव्हीएलआर, दुर्गानगर सिग्नलजवळील नमस्कार इमारसमोरील निको रेमेंडन्सी इमारती आणि त्यातील फ्लॅटच्या तारतंत्री आणि विद्युत जोडणीचे कॉन्ट्रक्ट मिळाले होते. त्यासाठी त्यांनी एक एमएम व्यासाची पॉलिकॅब कंपनीची वायर तीनशे मीटरचा बडल असे ५९, दिड एमएम व्यासाची पॉलिकॅब कंपनीची वायर तीनशे मीटरचा बडल असे ४२, अडीच एमएम व्यासाची पॉलिकॅब कंपनीची वायर तीनशे मीटरचा बडल असे २०, चार एमएम व्यासाची पॉलिकॅब कंपनीची वायर दोनशे मीटरचे बडल असे ३८, सहा एमएम व्यासाची पॉलिकॅब कंपनीची वायर दोनशे मीटरचे बडल असे १८ असा १४ लाख ९१ हजार ८६५ रुपयांचा वायरचा साठा सी विंगच्या फ्लॅट क्रमांक २०३ मध्ये ठेवले होते.
गरजेनुसार ते वायर काढून घेत होते. ३ ऑक्टोंबरला दिवसभराचे काम संपवून ते घरी निघून गेले होते. दुसर्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता ते तिथे आले होते. त्यांनी फ्लॅटचा लॅच लॉक उघडला असता फ्लॅटमध्ये त्यांना वायरचा साठा दिसून आला नाही. त्यांना दोन्ही रुमचे लॅच तसेच बाथरुमचा सेफ्टी ग्रिल तोडून अज्ञात व्यक्तीने आत प्रवेश करुन ही चोरी केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांना ही माहिती दिली होती. घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रभाकर दुधभाते यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुर केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी महेंद्र जैन याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. या गुन्ह्यांत त्याला कोणी मदत केली आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहे.