कर्जाच्या आमिषाने गंडा घालणार्या मुख्य वॉण्टेड आरोपीस अटक
दोन कोटीच्या कर्जासाठी साडेसात लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – कर्जाच्या आमिषाने गंडा घालणार्या एका मुख्य वॉण्टेड आरोपीस जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. राजूभाई राठोड ऊर्फ राजू शहा ऊर्फ अरविंद शाह असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अरविंद शाहने कर्जासह नोकरीच्या आमिषाने मुंबईसह नाशिक शहरातील अनेक बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यासाठी त्याने विविध बँकेत दहा खाती उघडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. राजेश भास्कर हा सहआरोपी असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
कैलास हरिश्चंद्र राठोड हे मूळचे रायगडच्या खालापूरचे रहिवाशी असून ते सिव्हील कॉन्ट्रक्टर आहेत. राजेश भास्कर हा त्यांचा परिचित असून ते दोघेही एकमेकांना चार वर्षांपासून ओळखतात. त्याची एसआरबी ऑटो नावाचे एक बाईक शोरुम आहे. त्याच्याच शोरुममधून त्यांनी एक बाईक घेतली होती. तो त्यांचा अत्यंज जवळचा मित्र असल्याने त्यांनी त्याला पैशांची गरज असल्याचे सांगून कोणही परिचित फायनान्सर असेल तर सांगण्याची विनंती केली होती. याच दरम्यान त्याने त्यांची ओळख अरविंद शाहशी करुन दिली होती. तो व्यावसायिक कर्ज देत असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनी त्यांची जोगेश्वरीतील राधाकृष्ण हॉटेलमध्ये भेट झाली होती. यावेळी त्यांच्यात कर्जाविषयी सविस्तर चर्चा झाली होती.
कैलास राठोड यांना दोन कोटीची गरज होती. यावेळी अरविंदने त्यांना रॉयल इंटरप्रायजेस फायनान्स कंपनीच्या वतीने कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. तीन वर्षांसाठी त्यांना दोन कोर्टीचे कर्ज दिले जाईल, मात्र त्यांना तीन वर्षांत कंपनीला तीन कोटी परत करावे लागेल अशी अट ठेवण्यात आली होती. त्यास कैलास राठोड यांनी होकार दर्शविला होता. याच कर्जासाठी अरविंद शाहने त्यांच्याकडून टप्याटप्याने सात लाख रुपये घेतले होते. त्यात त्यांचे कमिशनसह प्रोसेसिंग फी आदींचा समावेश होता. २१ जुलै २०२५ रोजी त्यांना नवी मुंबईतील कळंबोली येथे कर्जाचा धनादेश घेण्यासाठी बोलाविण्यात आले होते, मात्र बराच वेळ वाट पाहूनही तिथे अरविंद शाह आला नाही.
दुसर्या दिवशी राजेश भास्कर आणि आत्माराम दवणे यांनी त्यांना वाशी रेल्वे स्थानकात बोलाविले, तिथे त्यांना २५ लाखांचे चार धनादेश देण्यात आले. त्यापैकी एक धनादेश त्यांनी बँकेत टाकला होता, मात्र पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश बाऊन्स झाला. याबाबत त्यांनी अरविंद शाह आणि राजेश भास्करकडे विचारणा केली. मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. याच दरम्यान त्यांना अरविंद शाहने वेगवेगळ्या लोकांच्या नावाने सिमकार्ड घेऊन बोगस कागदपत्रांच्या आधारे अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे समजले.
मुंबईसह नाशिक शहरातील अनेक तरुणांची त्याने नोकरीच्या आमिषाने फसवणुक केली होती. फसवणुकीसाठी त्याने दहा वेगवेगळ्या बँकेत खाती उघडल्याचे उघडकीस आले आहे. दोन कोटीचे कर्ज देतो असे सांगून त्यांनी त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये घेतले होते. मात्र बोगस धनादेश देऊन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात अरविंद शाह, राजेश भास्कर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते.
अखेर चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या अरविंद शाह ऊर्फ राजूभाई राठोड याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात अरविंद हा फसवणुकीच्या कटातील मुख्य आरोपी असून त्याने कर्जासह नोकरीच्या आमिषाने अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. त्याच्या चौकशीतून या संपूर्ण गुन्ह्यांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.