फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या व्यापार्‍याला एक वर्षांनी अटक

सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या शुद्ध सोन्याचा अपहार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२६
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या ज्वेलर्स व्यापार्‍याला चारकोप पोलिसांनी अटक केली. तेजस ललित सोनी असे या व्यापार्‍याचे नाव असून त्याच्यावर सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन चेन्नईतील एका ज्वेलर्स व्यापार्‍याची फसवणुक केल्याचा आरोप आहे. तेजसने तक्रारदारासह इतर काही ज्वेलर्स व्यापार्‍यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे बोलले जाते. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

अक्षय अभय मेहता हे मूळचे चेन्नईचे रहिवाशी असून ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांच्या कुटुंबियांचा १९१० पासून सोन्याच्या दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. १९९२ साली त्यांच्या आजोबा आणि बाबांनी मिळून मेहता ज्वेलरी नावाची एक कंपनी सुरु केली होती. या कंपनीचे मुख्य कार्यालय चेन्नईच्या अभिरामपुरम परिसरात आहे. कंपनीत त्यांच्या आईसह अक्षय मेहता हे भागीदार आहेत. त्यांची कंपनी चेन्नईसह मुंबई, जयपूर, सुरत, अहमदाबाद, कोईम्बतूर अशा वेगवेगळ्या शहरात सोन्याच्या दागिन्यांची विक्री करते. फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे वडिल अभय मेहता यांची ऐश्‍वर्या छेडाशी ओळख झाली होती.

ऐश्‍वर्या ज्वेलरी डिझायनरचे काम करत होती. ऐश्‍वर्यानेच त्यांची ओळख तेजस सोनी या ज्वेलरी डिझायनरशी करुन दिली होती. त्याच्या मालकीचे कांदिवलीतील चारकोपमध्ये एक कार्यालय होते, तिथेच तो ज्वेलर्स व्यापार्‍यांना वेगवेगळ्या डिझायनरचे सोन्याचे दागिने बनवून देत होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्याची तिथे भेट घेतली होती. त्याने त्यांना त्याच्याकडील वेगवेगळ्या डिझाईन्सचे काही सोन्याचे दागिने दाखविले होते, ते दागिने त्यांना खूप आवडले होते. त्यामुळे अभय मेहता यांनी त्यांच्याकडून काही दागिने विकत घेतले होते.

याच दरम्यान अभय मेहता यांनी जी ४५ हुन्नर ऍण्ड एम जे नावाचा एक व्हॉटअप ग्रुप सुरु केला होता. त्यात त्यांच्यासह त्यांच्या कंपनीचे कर्मचारी व इतर सदस्यांचा समावेश होता. काही दिवसांनी तेजस सोनीने त्यांना वेगवेगळ्या डिझाईन्सचे सोन्याचे दागिने पाठविले होते, ते दागिने त्यांनी त्यांच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये शेअर केले होते. ते दागिने अनेकांना आवडल्याने त्यांनी अशाच प्रकारचे दागिने बनविण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे त्यांनी तेजसला ७४ हजार ३३ हजार ३४२ ग्रॅम वजनाचे १००६ ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. यावेळी त्याने त्यांना महिन्याभरात दागिने बनविणयाचे आश्‍वासन दिले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना सोन्याचे दागिने बनवून दिले होते. वडिल आजारी असल्याचे तसेच इतर काही कारण सांगून तो त्यांना टाळ्याचा प्रयत्न करत होता. दोन ते तीन महिने उलटून गेल्यानंतरही त्याने त्यांना दागिने दिले नाही. नंतर त्याने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी मार्केटमध्ये तेजसविषयी माहिती काढण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना तेजसने अशाच प्रकारे इतर ज्वेलर्स व्यापार्‍याची फसवणुक केल्याचे समजले. त्यांच्याकडून दागिने बनविण्यासाठी शुद्ध घेऊन त्यांना दागिने किंवा शुद्ध सोने परत न करता त्याने त्यांना गंडा घातला होता.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी नोव्हेंबर २०२४ रोजी तेजसविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची माहिती प्राप्त होताच त्यांना पाच लाख रुपये परत केले तसेच बॅकेतून कर्ज मंजूर होताच उर्वरित पैसे देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र त्याने दिलेल्या मुदतीत उर्वरित रक्कम दिली नाही किंवा शुद्ध सोने परत केले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या ६९ लाख ३३ हजार ३४२ रुपयांच्या शुद्ध सोन्याचा अपहार केल्याप्रकरणी तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तेजस सोनीविरुद्ध ऑगस्ट २०२५ रोजी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.  गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या तेजसला अखेर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page