सायबर फसवणुकीच्या रक्कमेतून मोबाईल खरेदीचा पर्दाफाश

१९.६६ लाखांच्या २५ महागड्या फोनसह दोघांना अहमदाबाद येथून अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सायबर फसवणुकीच्या रक्कमेतून महागडे मोबाईल खरेदी करणार्‍या एका टोळीचा एल. टी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १९ लाख ६६ हजार रुपयांचे २५ हून अधिक महागडे मोबाईल जप्त केले आहेत. अनिसबेग समीरबेग मिर्झा आणि मोईन रहिम शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही गुजरातच्या अहमदाबादचे रहिवाशी आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने एका नामांकित बँकेच्या मॅनेजरची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

इमान आयुब मापारी हे ४७ वर्षांचे तक्रारदार शिवडी बस डेपोजवळील विना-बिना अपार्टमेंटमध्ये राहतात. ते झव्हेरी बाजार येथील नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून कामाला आहेत. १५ सप्टेंबरला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन एका बँकेतून बोलत असल्याचे सांगितले.त्यांच्या क्रेडिट कार्डवर एमओ सर्व्हिस सुरु आहे. ती बंद केली नाहीतर त्यांना दहा हजार चार्ज भरावा लागेल असे सांगितले. यावेळी त्यांनी ऍपच्या माध्यमातून सर्व्हिस बंद करतो असे सांगितले. त्यानंतर त्याने एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करताच त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन स्विगीवर काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यांच्या कार्डवरुन अज्ञात सायबर ठगाने ४ लाख ४८ हजार ७२१ रुपयांचे तीन व्यवहार करुन फसवणुक केली होती.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमातर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. ज्या स्विगी प्लॅटफॉर्मवरुन ऑनलाईन खरेदी करण्यात आली होती, त्याची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. ही माहिती काढताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अनिसबेग मिर्झा याला कुर्ला येथून ताब्यात घेतले होते, चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला आहे.

त्याच्या चौकशीतून मोईन शेख याचे नाव समोर आले होते, तो गुजरातच्या अहमदाबाद येथे राहत असल्याने एक टिम तिथे पाठविण्यात आली होती. या पथकाने अहमदाबा येथील राहत्या घरातून मोईन शेख याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. या दोघांकडून पोलिसांनीी ऍपल कंपनीचे दोन, सॅमसंग, ऍपल, गुगल आणि विवो कंपनीचे २३ असे १९ लाख ६६ हजार रुपयांचे एकूण २५ मोबाईल जप्त केले आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत त्यांच्या इतर काही सहकार्‍यांचा सहभाग आहे, त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बुवा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देखमुख, सायबर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस निरीक्षक दिग्विजय मेटकरी, सतीश बर्डे, अमोल गोगावले, पोलीस शिपाई अविनाश पाटील, संतोष कचरे, निलेश झगडे, अमोल जगदाळे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, सागर विचारे, पोलीस शिपाई जगदेव आदी पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page