७० लाखांच्या पेमेंटचा अपहारप्रकरणी व्यावसायिकाला अटक
गुन्हा दाखल होताच गेल्या दिड महिन्यांपासून फरार होता.
अरुण सावरटकर
६ जुलै २०२६
मुंबई, – सुमारे ७० लाखांच्या माईल्ड स्टिल पेमेंटचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक करुन पळून गेलेल्या आरोपी व्यावसायिकाला अखेर मालाड पोलिसांनी अटक केली. संदीप राघोबा सावंत असे या आरोपी स्टिल व्यावसायिकाचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
अदित मनोज बेरिवाल हे स्टिल व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांनी स्वतचा स्टिलचा व्यवसाय सुरु होता. त्यांच्या कंपनीचे कार्यालय मालाडच्या मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील ई झोन मॉलमध्ये तर एक गोदाम नवी मुंबईतील तळोजा, एमआयडीसी परिसरात आहे. या ठिकाणातून त्यांचे सर्व व्यवहार चालत असून याकामी त्यांना त्यांचे वडिल मनोज बेरिवाल हे मदत करतात. जुलै २०२५ रोजी त्यांच्या मित्रामार्फत त्यांची ओळख संदीप सावंतशी झाली होती. संदीप हादेखील स्टिल व्यावसायिक होता, त्याची साईराज स्टिल कार्पोरेशन नावाची एक कंपनीत पनवेल येथे होती. त्याला त्यांच्यासोबत व्यवसाय सुरु करायचा होता. काही दिवसांनी त्यांनी त्यांच्याकडे माईल्ड स्टिलची मागणी केली होती.
ते दोघेही एकाच व्यवसायाशी संबंधित असल्याने त्यांनी त्याला मागणीनुसार स्टिल साहित्य दिले होते. जुलै २०२५ पासून त्यांच्यातील व्यवहाराला सुरुवात झाली होती. त्याचे पेमेंट त्याने टप्याटप्याने करुन आदित बेरिवाल यांचा विश्वास संपादन केला होता. या व्यवहाराच्या माध्यामातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे त्यांच्यातील व्यवहार सुरु राहिला होता. ६ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत त्यांनी संदीप सावंतच्या त्याच्या मागणीनुसार ७० लाख ८६ हजार ६६२ रुपयांचे १ लाख ११ हजार ८७५ किलो माईल्ड स्टिलची डिलीव्हरी केली होती. मात्र दोन ते तीन महिने उलटूनही त्याने माईल्ड स्टिलचे पेमेंट केले नव्हते. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या वडिलांनी संदीपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,
मात्र त्याने त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे कारण सांगून तो पेमेंट देण्यास टाळाटाळ करत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांचे वडिल त्याच्या पनवेल येथील तळोजा, कोहीनूर इंडस्ट्रियल इस्टेटमधील कार्यालयात गेले होते. तिथे गेल्यानंतर मनोज बेरिवाल यांना त्याचे कार्यालय गेल्या एक महिन्यांपासून बंद असल्याचे दिसून आले. तो एक महिन्यांपासून त्याच्या कार्यालयात आला नव्हता. चौकशीदरम्यान संदीप सावंत कोणालाही काहीही न सांगता कार्यालय बंद करुन पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच आदित बेरिवाल यांनी मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संदीप सावंतविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. गेल्या दिड महिन्यांपासून संदीप सावंत हा पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तीन दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने सुमारे ७० लाखांच्या माईल्ड स्टिलच्या पेमेंटचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पेालिसांनी अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही व्यावसायिकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.