पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला मालवणी पोलिसांनी अटक केली. शेख तौहिद शेख वाहिद असे या आरोपी पतीचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सप्टेंबर महिन्यांत त्याची पत्नी हिना तौहिद शेख हिने तिच्या माहेरच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तौहिद आणि हिनाचा फैब्रुवारी महिन्यांत प्रेमविवाह झाला आणि अवघ्या सात महिन्यांत तिने पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गुडिया हिदायत शेख ही महिला मालाडच्या मालवणी, साने गुरुजी वसाहतीत राहते. तिचे पती कापड व्यापारी असून त्यांचा नेपीयन्सी येथे व्यवसाय चालतो. हिना ही तिची मुलगी असून तिचे ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अकोला येथील शिरगावचा रहिवाशी असलेला तौहिद शेख याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर ती त्याच्यासोबत अकोला येथे राहत होती. लग्नानंतर या दोघांचा संसार व्यवस्थित सुरु होता. मात्र ऑगस्ट महिन्यांत हिनाने तिला कॉल करुन तिचा पती तौहिद याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती सांगितली होती. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर गुडियाने तिची समजूत काढून आपसांत त्यांच्यातील वाद मिटविण्याचा सल्ला दिला होता.
१८ सप्टेंबरला हिना ही तिची बहिण आयेशासोबत कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती. यावेळी हिनाने तिला कॉल करुन तौहिद तिला बेदम मारहाण करत आहे. त्यामुळे तिने तिला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. तिने व्हिडीओ कॉल केल्यानंतर ती तिच्या घरी होती. तिने अर्ंतवस्त्र घातले होते आणि तौहिद हिला विवस्त्र करुन बेदम मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आयेशाने व्हिडीओ कॉलचे काही स्क्रिनशॉट काढले होते. या प्रकारानंतर गुडिया ही आयेशासोबत रात्री उशिरा ट्रेनने अकोलाला गेली होती. १९ सप्टेंबरला त्या दोघीही अकोला येथील हिनाच्या घरी पोहचले होते.
यावेळी त्यांनी तौहिदला हिनाला मारहाणीचा जाब विचारला होता. त्याने हिना घरी काहीच काम करत नाही, सतत संशय घेऊन त्रास देते. त्यामुळे तिच्यासोबत त्याला राहायचे नाही, हिना श्रीमंत आहे. लग्नात किमान पाच ते दहा लाखांचा हुंडा मिळेल असे वाटत होते, मात्र तुमच्या काहीच नाही. त्यामुळे तिला घेऊन जा आणि पुन्हा तिचा चेहरा दाखवू नका असे सांगितले. या प्रकारानंतर त्या दोघीही हिनाला घेऊन मुंबईत घेऊन आले. तौहिदने केलेल्या मारहाणीत हिनाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे मुंबईत येताच त्यांनी तिच्यावर औषधोपचार सुरु केले होते. काही दिवसांनी तिचा दिर फिरोज हा हिनाला कॉल करुन त्यांच्यातील वाद विसरुन पुन्हा घरी येण्यास सांगत होता. मात्र तौहिद तिचे कॉल घेत नव्हता.
घडलेल्या प्रकारामुळे हिना ही प्रचंड मानसिक तणावात होती. तिला नैराश्य आले होते. घरी ती शांत राहत होती, कोणाशी जास्त बोलत नव्हती. २२ सप्टेंबरला दुपारी एक वाजता हिना ही आंघोळीसाठी जात असे सांगून तिसर्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये गेली होती. मात्र बराच वेळ होऊन ती परत आली नाही. त्यामुळै तिचा भाऊ गुलजार हा हिनाला बोलाविण्यासाठी फ्लॅटमध्ये गेला होता. यावेळी त्याला हिनाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबातील सर्वजण तिथे गेले होते. त्यांनी तिला खाली उतरवून तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुडिया शेख हिची पोलिसांनी जबानी नोंदविण्यात आली होती. तौहिदने लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवून तिच्या मुलीचा मानसिक व शारीरिक शोषण केले, तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करुन तौहिदविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हिनाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दोन दिवसांपूर्वी तौहिदला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.