अज्ञात महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश

हत्येनंतर पुरावा नष्ट करणार्‍या जोडीदाराला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 नोव्हेंबर 2025
ठाणे, – कल्याणकडे जाणार्‍या रोडवरील देसाई गावाकडील खाडी ब्रिजजवळ सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात ठाण्याच्या शिळ डायघर पोलिसांनी यश आले आहे. या हत्येप्रकरणी मृत महिलेचा जोडीदार विनोद श्रीनिवास विश्वकर्मा या 50 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच क्षुल्लक वादातून प्रियांका विश्वकर्मा या 22 वर्षांच्या महिलेची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याची कबुली दिली आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कुठलाही पुरावा नसताना गुन्हा दाखल होताच अवघ्या 24 तासांत शिळ डायघर पोलिसांनी या गुन्ह्यांचा छडा लावून मुख्य आरोपीस अटक केल्याने वरिष्ठांकडून संबंधित पोलीस पथकाचे कौतुक करण्यात आले.

सोमवारी दुपारी एक वाजता ठाणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला कल्याणकडे जाणार्‍या रोडवरील देसाई गावचे पुढील खाडी ब्रिजजवळ एका बॅगेत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती प्राप्त झाली होती. ही माहिती नंतर स्थानिक पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली होती. यावेळी पोलिसांना एका बॅगेत 20 ते 25 वयोगटातील एका महिलेचा मृतदेह दिसून आला. तिने गुलाबी रंगाचा टॉप, त्यावर नक्षीदार फुलांनी डिझाईन, त्याखाली लाल रंगाची लेगिन्स घातले होते. तिच्या डाव्या हाताला पीव्हीएस असे इंग्रजीत गोंदलेले होते. तिचा मृतदेह फुगलेले आणि कुजलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे तिची ओळख पटविण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. अज्ञात व्यक्तीने मृत महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह बॅगेत भरुन खाडीजवळ फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिळ डायघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या हत्येच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे, प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, अनिल राजपूत, योगेश लामखडे, शहाजी शेळके, अमोल पोवार, पोलीस उपनिरीक्षक माने, बेळगे, तिडके, पोलीस हवालदार श्यामकुमार राठोड, हनुमंत मोरे, भरत जाधव, तेजस परब, विश्वास मोटे, महेंद्र लिंगाळे, सचिन कोळी, अजय साबळे, रमेश पाटील, विक्रांत कांबळे, पोलीस नाईक मंदार यादव, महेंद्र पाटील, पोलीस शिपाई संदीप बोरकर, सुशिल पवार, ललित महाजन, जयेश येळवे, रत्नदिप चौधरी, अक्षय पाडळे, स्वप्निल सोनवलकर, वाहिद तडवी, विजय खाडे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.

ही शोधमेाहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी विनोद विश्वकर्मा या संशयिताला ताब्यात घेतले होते. तपासात विनोद हा उत्तरप्रदेशच्या गोरखपूर, देसाईगावचा रहिवाशी आहे. त्यानेच मृत महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. मृत तरुणीचे नाव प्रियांका विश्वकर्मा असून ती गेल्या पाच वर्षांपासून आरोपीसोबत राहत होती. शुक्रवारी 21 नोव्हेबरला रात्री साडेअकरा वाजता त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर त्याने प्रियांकाची गळा आवळून हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह एका बॅगेत भरला होता. एक दिवस त्याने ती बॅग त्याचाच घरी ठेवली होती.

मात्र मृतदेहामुळे घरात दुर्गंधी सुटल्यानंतर त्याने शनिवारी रात्री उशिरा त्याने ती बॅग खाडी पुलाजवळ आणली होती. त्यानंतर ती बॅग पुलावरुन खाली फेंकून तो पळून गेला होता. मयत महिलेसह आरोपीबाबत कुठलीही माहिती पोलिसांना उपलब्ध नव्हती. तरीही सोशल मिडीयावर प्रसारीत झालेल्या बातमीवरुन या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. याबाबत गुन्हा दाखल होताच अवघ्या 24 तासांत पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली. याच गुन्ह्यांत विनोद हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page