सिडकोच्या सहाय्यक वसाहत अधिकार्‍यासह दोघांना अटक

खाजगी व्यक्तीच्या मदतीने लाचेची रक्कम घेतल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 जानेवारी 2026
नवी मुंबई, – फ्लॅट सिडको ट्रान्स्फरसाठी चार लाखांच्या लाचेची मागणी करुन दोन लाख रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता घेताना सिडकोच्या एका अधिकार्‍यासह दोघांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. शैलेश आत्माराम घरत आणि नागेंद्र तुलसीराम पांडे अशी या दोघांची नावे आहेत. यातील शैलेश घरत हे सिडकोमध्ये प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर नागेंद्र पांडे हा खाजगी व्यक्ती आहे. त्याने शैलेश घरत यांच्या वतीने तक्रारदाराकडून दोन लाखांची रक्कम घेतली होती. दरम्यान या कारवाईनंतर शैलेश घरत यांच्या घराची झडती घेण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईचा तपशील समजू शकला नाही.

यातील तक्रारदार नवी मुंबईतील रहिवाशी असून ते कंत्राटदारासह सोसायटी रजिस्ट्रेशन आणि सिडको ट्रान्स्फरचे काम करतात. त्यांच्याकडे अधिकार पत्र प्राप्त असलेल्या सानपाडा येथील एका फ्लॅटचे सिडको ट्रान्स्फर करण्याचे काम आले होते. त्यासाठी 11 जून 2025 रोजी त्यांनी ऑनलाईन फ्लॅट ट्रान्स्फरसाठी अर्ज केला होता. याच कामासाठी ते सिडको कार्यालयात सहाय्यक वसाहत अधिकारी शैलेश घरत यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांना फ्लॅट सिडको ट्रान्स्फर करण्यासाठी चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय सिडको ट्रान्स्फर होणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून 22 जानेवारी 2026 रोजी शैलेश घरत यांच्याविरुद्ध नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

27 जानेवारीला या तक्रारीची संबंधित अधिकार्‍यांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी शैलेश घरत यांनी त्यांच्याकडे चार लाखांची लाचेची मागणी करुन तडतोडीनंतर दोन लाख रुपयांची लाच घेण्याचे मान्य केले होते. तसेच लाचेची ही रक्कम नागेंद्र पांडे यांना देण्यास सांगितले होते. बुधवारी 28 जानेवारीला पोलीस उपधिक्षक धर्मराज सोनके, पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ, अरुंधती येळवे व अन्य पोलीस पथकाने नेरुळ रेल्वे स्थानकाजवळील नवमी हॉटेलमध्ये सापळा लावला होता.

ठरल्याप्रमाणे तिथे नागेंद्र पांडे हा आला होता. यावेळी त्याला तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ही लाच शैलेश घरत यांच्या सांगण्यावरुन घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर या अधिकार्‍यांनी नेरुळ येथील सिडको कार्यालयातून शैलेश घरत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपीचे मोबाईल ताब्यात घेतले आहे. त्यात त्यांच्यात लाचेसंदर्भात संभाषण झाल्याचे उघडकीस आले आहे.

त्यांच्याविरुद्ध 7 अ, 12 भष्ट्राचार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून याच गुन्ह्यांत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर दुसर्‍या अन्य पथकाने शैलेश घरत यांच्या घराची झडती घेण्याची कारवाई सुरु केली होती. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page