भाड्याने घेतलेल्या कारचा अपहार करणार्या भामट्याला अटक
आरोपींकडून 2.44 कोटीचे 32 महागड्या कार हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 फेब्रुवारी 2026
ठाणे, – भाड्याने घेतलेल्या कारचा अपहार करुन फसवणुक करणार्या एका रेकॉर्डवरील आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. संदीप रघु शेट्टी असे या 38 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 2 कोटी 44 लाख रुपयांच्या 32 महागड्या कार हस्तगत केल्या आहेत. त्याच्या अटकेने अशाच अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
यातील तक्रारदार ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहत असून त्यांच्या मालकीचे पाच कार आहेत. फेब्रुवारी महिन्यांत त्यांच्याकडे संदीप शेट्टी आला होता. त्याने त्यांच्या पाचही कार भाड्याने घेतल्या. मात्र त्यांना कारचे भाडे न देता, कार परत न करता पळून गेला होता. त्याला कॉल करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. नंतर त्याने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. संदीप शेट्टीकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वागळे इस्टेट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पाच वाहनांचा अपहार करुन तक्रारदाराची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. संदीपने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले होते.
त्याची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने तपास सुरु केला होता. आरोपीचा शोध सुरु असताना तांत्रिक माहितीसह गुप्त बातमीवरुन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस हवालदार विजय काटकर, रोहिदास रावते, हर्षद तारी, संदीप शिंदे, पोलीस नाईक तेजस ठाणेकर, सचिन बंडगर, मिनीनाथ शिकारे, यश यादव यांनी पळनू गेलेल्या संदीप शेट्टीला ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याने अशाच प्रकारे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. अपहार केलेल्या कार त्याने जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी येथे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून पार्क केलेल्या 32 आलिशान कार हस्तगत केल्या आहेत. त्याची किंमत 2 कोटी 44 लाख 15 हजार रुपये इतकी आहे. संदीप हा नवी मुंबईतील उलवे परिसरात राहत असून तो अनेकांकडून कार भाडयाने घेऊन या कारचा अपहार करुन तक्रारदारांची फसवणुक करत होता. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद युवराज पाटील हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.