शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू

अपघातप्रकरणी दोन्ही आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 एप्रिल 2026
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चंदनकुमार मदन प्रसाद आणि रश्मी दिलीप चाळके यांचा समावेश आहे. याप्रकरणी कांदिवली आणि विक्रोळी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. याप्रकरणी मोहम्मद ताजीर जानमोहम्मद याला विक्रोळी पोलिसांनी अटक केली तर दुसरा अपघातातील बाईकस्वार गौरव वसंत पाटील हा जखमी झाल्याने त्याच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. हॉस्पिटलमधून डिस्वार्ज मिळताच त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहिला अपघात मंगळवारी 14 एप्रिलला रात्री आठ वाजता कांदिवलीतील बोरसापाडा, पोयसर जिमखान्यासमोर झाला. दिलीप गंगाराम चाळके हे कांदिवलीतील महावीरनगर परिसरात राहतात. ते महानगरपालिकेत वॉटर सप्लाय विभागात कामाला होते. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतचा रियल इस्टेटचा व्यवसाय सुरु केला होता. कांदिवलीतील गावठाण, महावीर कृपा इमारतीमध्ये त्यांचे एक खाजगी कार्यालय आहे. त्यांची पत्नी रश्मी कांदिवलीतील रघुलिला मॉलमधील वालिया असोशिएट्समध्ये अकाऊंट म्हणून कामाला आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली तर त्यांची मुलगी मनाली ही सीएची अंतिम वर्षांची परिक्षा असल्याने घरीच होती. काही वेहानंतर दिलीप चाळके हेदेखील त्यांच्या कार्यालयात निघून गेले होते.

रात्री आठ वाजता रश्मी ही कार्यालयातून तिच्या घरी येत होती. पोयसर जिमखान्यासमोरुन रस्ता क्रॉस करताना महावीरनगर येथून रघुलिला कॉलच्या दिशेने जाणार्‍या एका बाईकस्वाराने तिला जोरात धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रश्मीला स्थानिक लोकांनी तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते. या अपघातात आरोपी बाईकस्वार गौरव पाटील हा जखमी झाल्याने त्याच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

अपघाताची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दिलीप चाळके यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गौरव पाटील याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका महिलेच्या मृत्यूस तर स्वतला गंभीररीत्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हॉस्पिटलमधून डिस्वार्ज मिळाल्यांनतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

दुसरा अपघात बुधवारी पहाटे साडेचार वाजता विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्ग, भांडुप पंपिंगजवळ झाला. राहुलकुमार रघुनाथ प्रसाद हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या अ‍ॅण्टॉप हिल येथे राहतो. तो सध्या फिटरचे काम करत असून त्याच्यासोबत काम करणारा मित्र छत्रपाल यादव, उपेंद्र यादव आणि बहिणीचा पती चंदनकुमार हे तिघेजण राहतात. मंगळवारी रात्री आठ वाजता चंदनकुशमाक्षर हे कामावर गेले होते. भांडुप पंपिंगजवळ ते त्यांच्या सहकार्‍यासोबत काम करत होते. पहाटे सव्वाचार वाजता एका भरवेगात जाणार्‍या वाहनाने तिथे असलेल्या बॅरीकेटचा जोरात धडक दिली होती. त्यानंतर चालकाने चंदनकुमार यांना समोरुन धडक दिली. त्यात त्यांच्या पोटाला, मांडीला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती.

त्यांच्यासोबत काम करणारे जो जो थॉमस आणि मुकेशकुमार सिंग यांनी त्यांना तातडीने वीर सावरकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी आरोपी वाहनचालक मोहम्मद ताजीर जानमोहम्मद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page