दागिने बनविण्यासाठी दिलेले शुद्ध सोने घेऊन कारागिराचे पलायन
पळून गेलेल्या कारागिराच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मे 2026
मुंबई, – सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या 1651 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेऊन कारागिरानेच पलायन केल्याची घटना दादर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी माणिक मदन धला या कारागिराविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. माणिक हा कोलकाताचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जितेश छगनलाल जैन हे दादरच्या नायगाव परिसरात राहत असून ते ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा आतेभाऊ पिकेश जैन याच्या मालकीचे झव्हेरी बाजार परिसरात कमल पद्मावती आटर्स नावाचे एक शॉप आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्यांचा सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. माणिक धला हा त्यांच्या परिचित कारागिर असून अनेकदा ते त्याच्याकडूनच त्यांच्या शॉपमधील सोन्याचे दागिने बनवून घेत होते. 2019 साली जितेश जैन यांनी स्वतचा सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यांचे स्वतचे दादर येथे एक ज्वेलर्स शॉप आहे. माणिकवर विश्वास असल्याने त्यांनी त्याला अनेकदा शुद्ध सोने देऊन त्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेतले होते.
गेल्या वर्षी मार्च महिन्यांत त्यांच्यासह त्यांचा भाऊ राजेश जैन याने त्याला 1951 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिले होते. यावेळी त्याने पंधरा ते वीस दिवसांत दागिने बनवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक महिना उलटूनही त्याने त्यांना दागिने दिले नाही. नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांना तीनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बनवून दिले, मात्र उर्वरित पावणेतीन कोटीचे 1651 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिले नाही. वारंवार विचारणा करुनही तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. डिसेंबर 2025 रोजी त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याचा मोबाईल बंद होता.
त्याच्या सोसायटीमध्ये चौकशी केल्यानंतर माणिक हा त्याच्या पत्नीसोबत त्याच्या कोलकाता येथील गावी गेल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी त्याला सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याने त्यांचा त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. फेब्रुवारी 2026 रोजी ते स्वतला कोलकाता येथील हावडा, माखोरधा, डोंमजुर येथील त्याच्या घरी गेले होते. तिथे त्यांना त्याची पत्नी भेटली. तिने त्याच्याशी वाद झाल्याने तो दोन दिवसांपासून घरी आला नाही असे सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्याबाबत चौकशी केली असता तिने त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ते कोलकाता येथून मुंबईत आले होते.
माणिकने सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या 1651 ग्रॅम वजनाचे पावणेतीन कोटीच्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी भोईवाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी कारागिर माणिक धला याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर माणिकविरुद्ध पोलिसांनी शुद्ध सोन्याचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपीच्या अटकेसाठी एक टिम लवकरच कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.