खोट्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून महिलेकडून खंडणी वसुली

वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस पाच महिन्यांनी अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ जुलै २०२६
मुंबई, – ड्रग्जसह सेक्स रॅकेटच्या खोट्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून एका टॅरो रिडींग करणार्‍या महिलेकडे पाच लाखांची खंडणीची मागणी करुन दोन लाखांची खंडणी वसुली केल्याच्या कटातील एका मुख्य वॉण्टेड आरोपीला आरे पोलिसांनी अटक केली. अहमद समद शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. स्वप्नाली सुनिल नाडेकर, कविता अजय यादव, फरहान मुस्तफा कादरी, राहुल सूर्यकांत कांबली, प्रदीप मृत्यूजंय पाठक आणि एरीक गीरगोल वेगस अशी या सहाजणांची नावे असून यातील स्वप्नाली व कविता या सामाजिक कार्यकर्त्या, प्रदीप पत्रकार तर एरिक निवृत्त पोलीस अधिकारी आहे.

४० वर्षांची तक्रारदार महिला ही टॅरोरिडिंगर असून अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहते. तिचे आई-वडिल पुण्यात राहत असून ती मुंबईत लोकांचे ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि राशिफळ बघण्याचे काम करते. १३ फेब्रुवारीला तिला राज नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तिला टॅरोरिडींगसाठी गोरेगाव येथील आरे कॉलनीजवळ बोलाविले होते. त्याने तिची प्रोफाईल पाहून, तिच्याविषयी अनेकांकडून चांगले ऐकल्याचे बतावणी करुन तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे १५ फेब्रुवारीला दुपारी पावणेतीन वाजता ती गोरेगाव येथील आरे कॉलनी, रॉयल पाम येथील व्हिला क्रमांक ४१५ मध्ये गेली होती. तिथे चार पुरुष आणि दोन महिला होत्या. त्यांनी तिला ते पोलीस असल्याचे सांगून ती ड्रग्ज तस्करीसह वेश्याव्यवसाय करत असल्याचा आरोप केला.

तिच्यावर कारवाईची धमकी देऊन त्यांनी तिच्याकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यापैकी एकाने तिला त्याचे पोलीस ओळखपत्र दाखविले होते. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली. तिने त्यांचा विरोध करुन आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. जिवाच्या भीतीने तिने त्यांना ऑनलाईन दोन लाख रुपये ट्रान्स्फर केले. त्यानंतर त्यांनी तिची सुटका केली. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. स्वतची सुटका केल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्याने त्याच्या मित्राला तिच्या मदतीसाठी पाठविले होते. त्यानंतर ते दोघेही आरे पोलीस ठाण्यात आले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध पोलीस असल्याची बतावणी करुन खंडणीसाठी धमकी देणे आणि खंडणी उकाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ज्या बँक खात्यात खंडणीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्याची डिटेल प्राप्त करुन पोलिसांनी फरहान कादरी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ते पैसे त्याचा नातेवाईक अहमद शेख याच्या सांगण्यावरुन घेतल्याची कबुली दिली.

त्याच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आले होते. त्यानंतर स्वप्नाली नाडेकर, कविता यादव, राहुल कांबली, प्रदीप पाठक आणि एरिक वेगस या पाचजणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींच्या अटकेनंतर अहमद शेख हा पळून गेला होता. गेल्या पाच महिन्यांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page