शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणार्या दोन आरोपींना अटक
दुप्पट रक्कमेचे गाजर दाखवून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जुलै २०२६
मुंबई, – शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणार्या दोन आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. प्रतिक प्रकाश क्षीरसागर आणि दिनेश जैनाराम यासरबला अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. दुप्पट रक्कमेचे गाजर दाखवून या टोळीने शेअरमध्ये गंुंतवणुक करण्यास भाग पाडून तक्रारदाराची सव्वाआठ लाखांची फसवणुक केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन महिन्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली तर इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
हितेश बच्चूभाई पौंडा हे कांदिवली येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. २६ फेब्रुवारीला त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने एक लिंक पाठविली होती. ही लिंक शेअरमार्केट गुंतवणुकीबाबत होती. लिंक ओपन करुन त्यांनी स्वताच्या नावाने रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर त्यांना कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. गु्रपमधील अनेक सभासदांनी विविध शेअरसंबंिधित स्किममध्ये गुंतवणुक केली होती. या गुंतवणकीवर त्यांना दुप्पट रक्कमेचे आमिष दाखविण्यात आले होते. याच दरम्यान ग्रुप ऍडमिनसह इतरांनी त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना दुप्पट रक्कमचे आमिष दाखविले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी विविध शेअर शेअरमध्ये ८ लाख २२ हजार ४०० रुपयांची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना प्रचंड फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी गुंतवणुक केलेल्या काही शेअरची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. या शेअर विक्रीतून त्यांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम ट्रान्स्फर करायची होती. त्यामुळे त्यांनी त्यांची मूळ व त्यावरील व्याजाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांना प्रॉफिटवर वीस टक्के रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांनी ती रक्कम भरण्यास नकार देऊन वीस टक्के कपात करुन उर्वरित रक्कम त्यांना पाठविण्याची विनंती केली. मात्र वारंवार विनंती करुनही ग्रुप ऍडमिनसह इतरांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
फसवुणकीचा हा प्रकार लक्षात त्यांनी कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासात त्यांनी ट्रान्स्फर केलेली रक्कम उत्तरप्रदेशातील वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन प्रतिक आणि दिनेश या दोघांना ताब्यात घेतले.
तपासात फसवणुकीची काही रक्कम या दोघांच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यांनी ती रक्कम गुन्ह्यांतील मुख्य आरोपींना दिली होती. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.