शॉर्टफिल्ममध्ये रोलच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक लैगिंक अत्याचार
वॉण्टेड असलेल्या कॅमेरामनला चार महिन्यानंतर अटक व कोठडी
अरुण सावरटकर- राजू परुळेकर
४ जुलै २०२६
मुंबई, – शॉर्टफिल्ममध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका देण्याची बतावणी करुन मुंबईहून गोवा येथे चित्रीकरणासाठी घेऊन गेलेल्या एका ३६ वर्षांच्या महिलेवर सामूहिक लैगिंक अत्याचार करुन, लैगिंक अत्याचाराचे व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करणार्या कटातील एका वॉण्टेड आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. रमेशचंद्र दिवाकर गुप्ता असे या ४५ वर्षीय आरोपी असून तो व्यवसायाने कॅमेरामन आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी कटातील दोन मुख्य आरोपी सोनू गुप्ता, सोनिया सोनू गुप्ता, समशेर युसूफअली आणि सलमान मेहबूब परवेज या चौघांना पोलिसांनी अटक केली असून रमेशचंद्र गुप्ता हा पाचवा आरोपी आहे. या गुन्ह्यांत ऍक्टर म्हणून काम करणार्या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या वृत्ताला तपास अधिकारी असलेले पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी दुजोरा दिला आहे.
३६ वर्षांची पिडीत महिला ही कांदिवली परिसरात राहत असून ती सोशल मिडीयावर रिलस्टार म्हणून परिचित आहे. तिने लहानसहान भूमिका केली असून तिला बॉलीवूडमध्ये करिअर करायचे होते. गेल्या वर्षी तिची सोनू आणि सोनिया गुप्ताशी ओळख झाली होती. या दोघांनी ते निर्माता-दिग्दर्शक असल्याचे सांगून काही चित्रपटांची निर्मिती तसेच दिग्दर्शन केले आहे. त्यांनी काही शॉर्टफिल्म बनविले आहे. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. सध्या ते दोघेही एका नवीन शॉर्टफिल्मव बनवत असून त्यात तिला मुख्य अभिनेत्रीची भूमिका देणार असल्याचे सांगितले. शॉर्टफिल्ममध्ये मुख्य भूमिका मिळत असल्याने तिने त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शविली होती. ऑगस्ट २०२५ रोजी ती संपूर्ण युनिटसोबत गोवा येथे गेली होती. बागा बिचवर त्यांनी पहिला संपूर्ण दिवस शॉर्टफिल्मचे शूटींग केले होतेे.
२३ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत त्यांनी तिला शेतपेयातून गुुंगीचे औषध दिले होते. ते औषध घेतल्यानंतर ती बेशुद्ध झाली होती. त्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर तिघांनी सामूहिक लैगिंक अत्याचार केला होता. या लैगिंक अत्याचाराचे त्यांनी शूटींग केले होते. त्यानंतर तिचा अश्लील व्हिडीओ त्यांनी एका खाजगी सोशल ऍपवर अपलोड करुन तिची बदनामीचा प्रयत्न केला होता. जानेवारी २०२६ रोजी संबंधित ऍपवर तिचा अश्लील व्हिडीओ तिच्या मावस भावाच्या निदर्शनास आला होता. तो व्हिडीओ डाऊनलोड करुन त्याने संबंधित् व्हिडीओ पिडीत महिलेला पाठवून तिच्याकडे चौकशी केली होती. तिचा अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. घडलेला प्रकार भावाला सांगून त्यांनी संबंधित आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
फेब्रुवारी महिन्यांत पिडीत महिला तिच्या भावासोबत समतानगर पोलीस ठाण्यात गेली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने या कटातील आरोपीविरुद्ध तक्रार करुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पिडीत महिलेची जबानी नोंदवून तिच्या तक्रारीवरुन सोनू गुप्ता, सोनिया गुप्ता तसेच इतर सहाजणांविरुद्ध पोलिसांनी ६४ (२), (आय), ६४ (२), (एम), १२३, ७४, ७७, ६१ (२), ३५१ भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (अ), ६७, ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वर्बे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, पोलीस अंमलदार नितीन बकराम, संदीप ओमकारे आदीनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना सोनू गुप्ता, सोनिया गुप्ता, समशेर युसूफअली आणि सलमान ऊर्फ मेहबूब परवेज या चार आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध नंतर बोरिवलीतील लोकल कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते.
या आरोपपत्रात शॉर्टफिल्मचा कॅमेरामन रमेशचंद्र गुप्ता व इतर तीन ऍक्टर अशा चौघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. रमेशचंद्रने पिडीत महिलेचे अश्लील सीन शूट करुन तिचा व्हिडीओ सोनू आणि सोनिया गुप्ता याला दिला होता. त्यासाठी त्याला ठराविक रक्कम मानधन म्हणून देण्यात आले होते. या चौघांच्या अटकेनंतर इतर चारही आरोपी पळून गेले होते. त्यामुळे त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या रमेशचंद्र गुप्ता याला पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, पोलीस अंमलदार नितीन बकराम, संदीप ओमकारे यांनी गुरुवारी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवार ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अद्याप तीनजण फरार असून ते तिघेही ऍक्टर आहेत, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.