उत्तर प्रदेशात गुन्हे असलेल्या टोळीच्या म्होरक्याला अटक
हॉटेलमध्ये स्वताचे अस्तित्व बदलून राहत असल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ ऑगस्ट २०२६
मुंबई, – उत्तरप्रदेशात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला एका टोळीच्या म्होरक्याला येलोगेट पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. निशांत राजेश सिंग असे या आरोपीचे नाव असून तो स्वतचे अस्तित्व बदलून एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांना देण्यात आली असून त्याचा ताबा संबंधित पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
येलोगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बे व्ह्यू हॉटेलमध्ये उत्तरप्रदेश पोलिसांनी फरार घोषित केलेला एक गॅगस्टर राहत आहे. या गॅगस्टवर उत्तरप्रदेशात अनेक गुन्हे दाखल असून त्याची स्वतची टोळी आहे. तो टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोज शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त पोपट आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चांदीवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सौरभ पिंगळे, पोलीस हवालदार उज्वल चौधरी, पोलीस शिपाई प्रल्हाद मांडवे, प्रशांत पवार, महिला पोलीस रितू मोकल यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवलली होती.
यावेळी तिथे आलेल्या निशांत सिंग याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने त्याची ओळख लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे वर्तन संशयास्पद वाटताच त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत निशांत हा उत्तरप्रदेशातील सितापूर, सितावलीच्या बलोरियाचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध रॉबरी, घातक शस्त्रे बाळगणे तसेच इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध सितापूर पोलिसांनी उत्तर प्रदेश गिरोहबंद समाजविरोधी क्रियाकलाप अधिनियम (गॅगस्टर ऍक्ट) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो उत्तरप्रदेशातून पळून गेला होता.
गेल्या काही दिवसांपासून तो मुंबई शहरात वास्तव्यास होता. अटकेच्या भीतीने तो बे व्ह्यू हॉटेलमध्ये राहत होता. ही माहिती नंतर उत्तरप्रदेश पोलिसांना देण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांना निशांत हा एका टोळीचा म्होरक्या असून त्याची स्वतची टोळी असल्याचे समजले. तो उत्तरप्रदेशात तीन गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी होता. त्याच्या अटकेची माहिती मिळताच उत्तरप्रदेशातील एक टिम मुंबईत आली होती. त्यानंतर निशांतला संबंधित पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. त्याला पुढील चौकशीसाठी उत्तरप्रदेशात नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.