व्हिडीओ लाईक टास्कद्वारे तरुणाला गंडा घालणार्‍या आरोपीस अटक

सायबर ठगांना बँक खात्याची डिटेल्स पुरविल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ ऑगस्ट २०२६
मुंबई, – युट्यूबवरील व्हिडीओ लाईकद्वारे जास्त कमिशनचे गाजर दाखवून एका तरुणाला २१ लाखांना गंडा घातणार्‍या आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. साद सोहेल चव्हाण असे या १९ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्यावर सायबर ठगांना स्वतच्या बँक खात्याचे डिटेल्स पुरविल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍या इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

देवांश अवनिदकुमार सिंग हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या तरुण मालाड येथे राहतो. त्याचे बीटेक संगणक सायन्सचे शिक्षण झाले असून तो सध्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ३ जूनला त्याला एका अज्ञात व्यक्तीचा मॅसेज आला होता. त्यात त्याने त्याला पार्टटाईम जॉबची ऑफर दिली होती. युट्यूब लिंक ओपन करुन त्यावरील फुट रेसीपीचे व्हिडीओ लाईक करुन ते स्क्रिनशॉर्ट शेअर करण्याचा हा टास्क होता. या टास्कद्वारे त्याला चांगला फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याने त्याला होकार दर्शविला होता. यावेळी विष्णू शर्मा नावाच्या एका व्यक्तीने त्याला काही टास्क दिले होते. त्यानेही दिलेले टास्क पूर्ण केले होते.

प्रत्येक टास्कवर त्याला दिडशे रुपयांचे कमिशन मिळत होते. ही रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात जमा होत होती. त्यामुळे त्याला त्यांच्याावर विश्‍वास निर्माण झाला होता. याच दरम्यान त्याला एका ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये प्रत्येकाला वेगवेगळे टास्क दिले जात होते. त्यांनी त्याला मूव्ही रिव्हीव करण्यास सांगून त्यात चांगले कमिशनचे गाजर दाखविले होते. त्यामुळे त्याने संबंधित टास्क पूर्ण केले होते. त्यासाठी त्याला प्रत्येकी सहाशे रुपये मिळत होते. त्यानंतर ऍडमिनने ग्रुपमधील सभासदांना जास्त कमिशनचे आमिष दाखवून त्यांना टास्कसाठी काही रक्कम गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते.

या टास्कच्या माध्यामातून त्यांना जास्त कमिशन मिळणार होते, त्यामुळे त्याने टास्कसाठी पैसे गुंतवणुक करण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी त्याला एक लिंक पाठविण्यात आली होती. या लिंकवर रजिस्ट्रेशन करुन त्याचे एक अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. तो अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करुन टास्क पूर्ण करत होता. त्यात त्याला चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले. मात्र त्याला त्याच्याच अकाऊंटमधून पैसे काढता येत नव्हते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी त्याला अकाऊंट अपडेटचा सल्ला दिला, नंतर त्याचे अकाऊंट फ्रिज झाले आहे असे सांगून त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती.

अकाऊंट अपडेटसह फ्रिज काढण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे ९ लाख ६५ हजाराची मागणी केली. त्यामुळे त्याने ती रक्कम ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर ते त्याच्याकडे आणखीन २८ लाखांची मागणी करत होते. ही रक्कम देणे शक्य नसल्याने त्यांनी त्याला सोळा लाख रुपये भरण्याचा सल्ला दिला. टास्कसह अकाऊंटमधीन कॅश विड्रॉल करण्यासाठी त्याने आतापर्यंत २१ लाख १६ हजार २५० रुपये ट्रान्स्फर केले होते, त्यासाठी त्याने काही मित्रांकडून उधारीने पैसे घेतले होते. आणखीन पैसे ट्रान्स्फर करणे शक्य नसल्याचे सांगताच त्यांनी त्याला प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. त्यात साद चव्हाण याच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यानंतर सादला तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच सायबर ठगांना त्याच्या बँक खात्याची डिटेल्स पाठविल्याची कबुली दिली. या माहितीनंतर त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ती रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्याला काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page