सहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण करणार्‍या अपहरणकर्त्याला अटक

तक्रार प्राप्त होताच अवघ्या चार तासांत मुलाची सुखरुप सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ ऑगस्ट २०२६
मुंबई, – घरासमोरच आईसोबत झोपलेल्या एका सहा महिन्यांच्या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याने कुर्ला परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबतची तक्रार प्राप्त होताच विनोबा भावे नगर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन आरोपीचा शोध घेऊन अवघ्या चार तासांत अमन आनंद सकट या २५ वर्षांच्या अपहरणकर्त्यांला अटक केली. त्याच्या तावडीतून पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाची सुखरुप सुटका करुन त्याला त्याच्या पालकाच्या स्वाधीन केले आहे. अपहरण झालेला मुलगा अवघ्या चार तासांत सुखरुप सापडल्याने त्याच्या पालकांनी पोलिसांनी आभार व्यक्त केले आहे. दरम्यान अमरनला सोमवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी होणार आहे. या चौकशीतून या अपहरणामागील कारणाचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सोनिया श्यामसुंदर कांबळे ही २० वर्षांची महिला सफाई कर्मचारी असून ती कुर्ला येथील हलाव पुल, मसरानी लेनच्या गौरीशंकर मंदिर, कमलाबाई चाळीत राहते. रविवारी सकाळी साडेपाच वाजता ती तिचा सहा महिन्यांचा मुलगा बाबूसोबत घराजवळ झोपली होती. काही वेळानंतर तिला जाग आली असता तिला तिचा मुलगा तिथे दिसला नाही. त्यामुळे ती प्रचंड घाबरली, तिने तिच्या मुलाचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे तिने विनोबा भावे नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या मुलाची मिसिंग तक्रार केली होती. बाबू हा सहा महिन्याचा असल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरु केला होता. दुसरीकडे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य पोलीस पथकाने पेट्रोलिंग करुन रेल्वे स्थानकासह निर्जनस्थळी तपासणी सुरु केली होती तर घाटकोपर, टिळकनगर, नेहरुनगर पोलिसांच्या विशेष पथकाने परिसरात आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. याच दरम्यान एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलाला घेऊन विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना दिसून आला. हाच धागा पकडून मुंबई पोलिसांनी ठाणे पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर विष्णूनगर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु करुन अपहरण झालेल्या बाबूची सुखरुप सुटका केली. त्याचे अपहरण करणार्‍या अमन सकट याला अवघ्या चार तासांत पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने या मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्याला अपहरणाच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या अपहरणामागे त्याचा काय उद्देश होता. अपहरण केलेल्या मुलाची तो कोणाला विक्री करणार होता, त्याने यापूर्वीही अल्पवयीन मुलांचे अपहरण केले आहे का, याकामी त्याला इतर कोणी मदत केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान अपहरण झालेल्या मुलाला त्याच्या तक्रारदार आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमीत ताड, पोलीस निरीक्षक अंबिके, पोलीस उपनिरीक्षक योगेश मुलमुले व अन्य पोलीस पथकाने अपहरण झालेल्या सहा महिन्यांच्या मुलाची चार तासांत सुटका करुन मुख्य आरोपीस गजाआड केले. त्यामुळे या पोलीस पथकाचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी कौतुक केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page