लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत जोरु का गुलामच्या दिग्दर्शकाला अटक

टिव्ही शो, वेबसिरीजमध्ये काम देतो सांगून अभिनेत्रीवर दहा वर्ष अत्याचार केला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – मालाडच्या मालवणी परिसरात राहणार्‍या एका अभिनेत्रीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी बडे दिलवाला, जोरु का गुलाम या चित्रपटाचा दिग्दर्शक शकील झकरिया नूरानी (७३) याला मालवणी पोलिसांनी सातारा येथून अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. टिव्ही शोसह वेबसिरीजमध्ये काम करतो असे सांगून त्याने पिडीत अभिनेत्रीवर गेल्या दहा वर्षांपासून लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्‍लील व्हिडीओ बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिचे अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने तिचा मानसिक व शारीरिक शोषण केले होते. अखेर दहा वर्षांनी पिडीत महिलेने पोलिसांनी मदत घेतली आणि शकील नूरानीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.

३३ वर्षांची पिडीत महिला अभिनेत्री असून मालाडच्या मालवणी परिसरात एकटी राहते. तिने आतापर्यंत अनेक टिव्ही शो, वेबसिरीजमध्ये काम केले आहे. २०१६ रोजी अंधेरी येथे टिव्ही शो, वेबसिरीज क्षेत्राशी संबंधित एक ऍवार्ड कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी ती गेली होती. तिथेच तिची शकील नूरानीशी ओळख झाली होती. त्यांनी बडे दिलवाले, जोरु का गुलाम आदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, त्यामुळे ती त्यांना ओळखत होती. त्यांनी तिला आगामी चित्रपटात काम हवे असल्यास संपर्क साधण्यास सांगितले होते. चार दिवसांनी तिने त्यांना संपर्क साधला होता. यावेळी तिने त्यांना तिच्या घरी बोलाविले होते. तिथेच त्यांनी तिला एक स्क्रिप्ट दिली, ती स्क्रिप्ट वाचून घे, तुला आवडल्यास मला होकार दे असे सांगितले होते.

ती स्क्रिप्ट वाचत असताना त्यांनी तिला शीतपेयातून गुंगीचे ओषध दिले होते. ती बेशुद्ध होताच त्यांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केला, तिचे अश्‍लील व्हिडीओ मोबाईलवर काढले होते. शुद्धीवर आल्यानंतर तिला हा प्रकार समजताच त्यांनी तिला व्हिडीओ दाखवून हा प्रकार कोणालाही सांगू नकोस. नाहीतर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर मी जेव्हा बोलवेन तेव्हा तुला माझ्याकडे यावे लागेल असे सांगितले. त्यानंतर शकील तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता. तिच्याशी लैगिंक अत्याचार करत होता. तिला गर्भनिरोधक गोळ्या प्राशन करण्यास प्रवृत्त करत होता. मुंबईसह महाबळेश्‍वरला त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्याच्या मित्र-मैत्रिणीसमोर तिला नाच करण्यास प्रवृत्त करत होता.

गर्भनिरोधक गोळ्याचा जास्त डोस घेतल्याने तिची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्याने तिला एका शासकीय हॉस्पिटलमध्ये गर्भपिशवी काढण्यास प्रवृत्त केले होते. तिने नकार देताच त्याने तिच्या आई-वडिलांना तिचे व्हिडीओ दाखविण्याची धमकी दिली होती. ऑगस्ट २०१६ ते जुलै २०२६ या दहा वर्षांचा कालावधीत टिव्ही शो, वेबसिरीजमध्ये काम देतो असे सांगून शकीलने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. तिचे अश्‍लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करुन तिला सोशय मिडीयावर बदनामीची धमकी दिली होती. त्याच्या या मानसिक आणि शारीरिक शोषणाला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

जुलै महिन्यांत तिने घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगून शकील नूरानीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्यविरुद्ध लैगिंक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शकील हा सातारा येथील मेंढा परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शकीलला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले होते.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही तरुणींसह महिलांना वेबसिरीज, टिव्ही शोमध्ये काम देतो असे सांगून त्यांचा गैरफायदा घेतला आहे का याचा पोलीस तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page