मालक नसताना फ्लॅटची विक्री करुन अठरा लाखांची फसवणुक

एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२६
मुंबई, – मालक नसताना विरार येथील सन हाईट्स अपार्टमेंटमध्ये असलेल्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका टेलरची अठरा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या मुख्य आरोपीला एक वर्षांनी कांदिवली पोलिसांनी अटक केली. रामसिंग जलसासिंग देवडा असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून या दोघांना सहआरोपी करण्यात आले आहे. या तिघांनीच सोशल साईटवर फ्लॅट विक्रीची बोगस जाहिरात करुन ही फसवणुक केल्याचे पोलिसांनी सांगितले. अठरा लाखांचे पेमेंट प्राप्त होताच तिन्ही आरोपी पळून गेले होते.

मनोज दलसुख साचला हे बोरिवली येथे राहत असून कांदिवली येथे टेलर म्हणून काम करतात. त्यांच्या वडिलोपार्जित कांदिवलीतील लालजीपाडा, जेठवानगर परिसरात एक फ्लॅट होता. या फ्लॅटच्या वाटणीवरुन त्यांच्या कुटुंबियांसोबत वाद होता, त्यामुळे त्यांनी फ्लॅटची विक्री करुन त्यातून प्रत्येकाला हिस्सा देण्याचे ठरविले होते. काही दिवसांनी त्यांनी फ्लॅटची विक्री केली, त्यातून त्यांच्या हिस्स्याला वीस लाख रुपये आले होते. याच पैशांतून त्यांना स्वतसाठी एक फ्लॅट खरेदी करायचा होता. याच दरम्यान त्यांना सोशल साईटवर विरार येथील सन हाईट्स इमारतीमध्ये एक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात दिसली होती. तिथे दिलेल्या मोबाईल क्रमाकांवर संपर्क साधल्यानंतर राज नावाच्या ब्रोकरने त्यांना फ्लॅटची माहिती दिली होती.

फ्लॅट सुनिल नंदा यादव याच्या मालकीचा असल्याचे सांगितले. फ्लॅटबाबत बोलणीसाठी राज आणि सुनिल हे दोघेही मालाड येथे आले होते. यावेळी सुनिलने फ्लॅटची किंमत वीस लाख रुपये सांगितली होती, मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी फ्लॅट देण्यास नकार दिला. मात्र काही दिवसांनी सुनिलने मनोजला फोन करुन त्याला पैशांची गरज असल्याने तो त्यांना अठरा लाखांमध्ये फ्लॅट देतो असे सांगितले. त्यानंतर मनोज हा विरारच्या सन हाईट्स फ्लॅट क्रमांक ११०१ मध्ये गेला होता. तिथे सुनिलसोबत राज आणि समीर हे दोघेही होते. या तिघांमध्ये अठरा लाखांमध्ये सौदा झाला होता.

ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना मार्च २०२३ रोजी अठरा लाखांचे पेमेंट केले होते. हा संपूर्ण व्यवहार त्यांच्या कांदिवलीतील बजाज रोडच्या डी. एन टेलर शॉपमध्ये झाला होता. पेमेंट करुनही सुनिलने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. फ्लॅटमध्ये कलरच्या कामासह इतर कामाचे कारण सांगून तो टोलवाटोलवी करत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी सोसायटीमध्ये जाऊन चौकशी केली होती. यावेळी त्यांना संबंधित फ्लॅटचा मालक सुनिल यादव नसल्याचे समजले. फ्लॅटचा मालक नसताना सुनिलने राज आणि समीरच्या मदतीने फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी पळून गेले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या रामसिंग देवडा या आरोपीस पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने बोगस नाव सांगून मनोज साचला यांच्याशी संपर्क साधून फ्लॅटचा व्यवहार केल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page