रो हाऊसच्या नावाने पिता-पूत्राची २७ लाखांची फसवणुक

खाजगी कंपनीच्या मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२६
मुंबई, – नाशिक येथे सुरु असलेल्या प्रोजेक्टमध्ये स्वस्तात रो हाऊस देतो असे सांगून एका वयोवृद्धासह त्याच्या मुलाची चारजणांच्या टोळीने सुमारे २७ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या मालकासह चौघांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राजीव राजा जाधव, ज्ञानेश्‍वर माधव घोडविंदे पवार, समीर पाटील आणि हर्षा जेठवा अशी या चौघांची नावे असून या चौघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

७१ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या पत्नीसोबत वांद्रे येथे राहत असून त्यांचा एक्सपोर्ट कन्सल्टेशनचा व्यवसाय आहे. त्यांची दोन्ही मुले सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. जानेवारी २०२१ साली त्यांना वर्तमानपत्रातून मुंबई-नाशिक, उंबर रेल्वे स्थानकाजवळील शिरोळ गावात रॉयल ब्ल्ूस प्रॉपटीजच्या वतीने एक प्रोजेक्ट सुरु असल्याचे समजले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना कंपनीकडून तिथे रो हाऊस बांधण्यात येत असल्याचे समजले होते. त्यामुळे ते बांधकाम साईट पाहण्यासाठी तिथे गेले होते. तिथेच त्यांची कंपनीचे मालक राजीव जाधवशी ओळख झाली होती. त्यांनी तीन एकर जागेत एकूण पाच ते सहा रो हाऊसचे बांधकाम होणार असल्याचे सांगून त्यांना रो हाऊसमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. १५०० चौ फुटाच्या या रो हाऊसची किंमत २१ लाख रपुये होते.

पंधरा लाखांचे पेमेंट केल्यानंतर त्यांना सहा महिन्यांत रो हाऊसचा ताबा मिळेल असे सांगितले. हा प्रपोजल चांगला वाटल्याने त्यांनी तिथे एक रो हाऊस खरेदीचा निर्णय घेतला होत. त्यासाठी त्यांनी राजीवला पंधरा लाखांचे पेमेंट केले होते. उर्वरित सहा लाख रो हाऊसचा ताबा मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. याबाबत अमेरिकेत राहणार्‍या मुलाशी चर्चा केल्यानंतर त्यानेही तिथे एक रो हाऊस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने तिथे ३६७६ चौ. फुटाचा रो हाऊस ३२ लाखांमध्ये बुक केला होता. त्यासाठी त्याने त्यांना १९ लाखांचे पेमेंट केले होते. अशा प्रकारे त्यांनी दोन्ही रो हाऊससाठी त्यांना ३४ लाखांचे पेमेंट केले होते. यावेळी दोघांनाही सहा महिन्यांत रो हाऊसचा ताबा देण्याचे मान्य करण्यात आले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना रो हाऊसचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर राजीवसह इतर आरोपी ज्ञानेश्‍वर पवार, समीर पाटील आणि हर्षा जेठवा हे त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. जानेवारी २०२५ पर्यंत त्यांना रो हाऊसचा ताबा मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी त्याला त्यांना दहा टप्यात सात लाख रुपवे परत केले, मात्र उर्वरित २७ लाखांचा परस्पर अपहार करुन तक्रारदार पिता-पूत्रांची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी राजीवकुमार यांच्यासह त्यांच्याकडे काम करणार्‍या इतर आरोपीविरुद्ध वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राजीव राजा जाधव, ज्ञानेश्‍वर माधव घोडविंदे पवार, समीर पाटील आणि हर्षा जेठवा या चारही आरोपीविरुद्ध रो हाऊससाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन तक्रारदार पिता-पूत्राची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या चारही आरोपीची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page