कामाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक महिलेच्या घरी हातसफाई
चोरीच्या हिरेजडीत दागिन्यांसह २४ वर्षांच्या मोलकरणीला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ ऑगस्ट २०२६
मुंबई, – कामाच्या पहिल्याच दिवशी एका व्यावसायिक महिलेच्या घरी हातसफाई करुन पळून गेलेल्या शरयू रामदास वायंगणकर नावाच्या २४ वर्षांच्या आरोपी मोलकरणीला खार पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून चोरीचे सुमारे साडेचार लाखांचे हिर्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. अटकेनंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काते यांनी दुजोरा दिला आहे.
६२ वर्षांची वयोवद्ध तक्रारदार महिला पूजा पाहूजा धोटे ही गेल्या सात वर्षांपासून खार येथील पाचवा रोड, मोहीनी टॉवर्स अपार्टमेंटमध्ये एकटीच राहते. तिचा गोरेगाव येथे फर्निचरचा व्यवसाय असून या व्यवसायाच्या उत्पनातून तिचा उदरनिर्वाह चालतो. वयोवृद्ध असल्याने तिने घरातील कामासाठी शुभांगी नावाच्या एका महिलेस कामावर ठेवले होते. मात्र शुभांगी ही सुट्टीवर गेल्याने ती स्नॅबिट मेड सर्व्हिसमधून दररोज दोन ते तीन तासाच्या कामासाठी मेड बोलवत होती. कंपनीकडून तिच्या घरी नेहमीच काही मेडला पाठविले जात होते. घरातील साफसफाईसह इतर काम करुन ते दोन ते तीन तासांनी निघून जात होते.
८ ऑगस्टला सायंाकाळी सहा वाजता ती कामावरुन घरी आली होती. यावेळी तिने तिच्या ज्वेलरी बॉक्समध्ये तिचे हिरेजडीत अंगठी, अमेरिकन डायमंड अंगठी, वॉच आणि चांदीची अंगठी ठेवली होती. दुसर्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता तिच्या घरी शरयू ही तीन तासांच्या कामासाठी आली होती. घरातील काम करुन ती दुपारी अडीच वाजता निघून गेली. १० ऑगस्टला सकाळी दहा वाजता तिने ज्वेलरी बॉक्स उघडले असता त्यात तिची चांदीची अंगठी आणि वॉच मिळून आले, मात्र साडेचार लाखांचे दोन्ही हिरेजडीत अंगठी मिसिंग होते. गेल्या २४ तासांत तिच्या घरी शरयू वगळता इतर कोणीही कामासाठी आले नव्हते, त्यामुळे तिनेच दोन्ही हिरेजडीत अंगठी चोरी करुन पलायन केल्याचा तिला संशय होता.
या घटनेनंतर तिने खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून शरयू वायगंणकरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. याच गुन्ह्यांत शरयू हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने ही चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीचे साडेचार लाखांचे हिरेजडीत दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.