दोन वेगवेगळ्या अपघातात दोन वर्षांच्या मुलासह वयोवृद्धाचा मृत्यू

माहीम-साकिनाका पोलिसांकडून दोन स्वतंत्र अपघाताची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२६
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत दोन वर्षांच्या मुलासह एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अब्दुल समद अस्लम मोहम्मद पटेल या दोन वर्षांच्या मुलासह मनोज हदय गिरी या ६५ वर्षांच्या वयोवृद्धाचा समावेश आहे. याप्रकरणी माहीम आणि साकिनाका पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांत रोशन राजेश जोशी या २२ वर्षांच्या बाईकस्वाराला माहीम पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर आरोपी कारचालकाचा साकिनाका पोलिसांकडून शोध सुरु आहे.

पहिला अपघात शनिवारी सकाळी सव्वापाच वाजता माहीम येथील एल जे रोड, पॅराडाईज सिनेमागृहासमोर झाला. धु्रप हदय गिरी हे रायगडच्या पेण-वडखळचे रहिवाशी असून एका खाजगी कंपनीत कामगार म्हणून कामाला आहेत. मूळचे बिहारचे रहिवाशी असलेल्या ध्रुप यांना चार भाऊ आणि तीन बहिणी आहेत. त्यापैकी मोठा भाऊ मनोज गिरी हा माहीमच्या शितलादेवी मंदिरजवळील गणेश अपार्टमेंटमध्ये राहतो. शनिवारी सकाळी सव्वापाच वाजता तो घरातून कामानिमित्त निघाला होता. पॅराडाईज सिनेमागृहासमोरुन रस्ता क्रॉस करताना त्याला एका बाईकस्वाराने जोरात धडक दिली होती.

या अपघातात धु्रपसह बाईकस्वार जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी जखमी दोघांनाही पोलिसांनी तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे मनोज गिरी याच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना सकाळी साडेआठ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात जखमी झालेल्या बाईकस्वार रोशन राजेश जोशी याच्यावर प्राथमिक औषधोपचार करुन त्याला माहीम पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसरा अपघात शनिवारी सायंकाळी सहा वाजता साकिनाका येथीली ९० फिट रोड, टायना टाऊन हॉटेलसमोरील दोस्ती प्लाझा इमारतीजवळ झाला. याच परिसरात अस्लम मोहम्मद पटेल हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून त्याचा लॅमिनेशन कटींगचा व्यवसाय आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्याचे दोन मुले अब्दुल हादी (५) आणि अब्दुल समद (२) हे दोघेही दोस्ती प्लाझा इमारतीच्या मेन गेटसमोरुन जात होते. यावेळी इमारतीच्या आवारात एक कार प्रवेश करत होती. यावेळी अब्दुल हादी हा कारला पाहून बाजूला झाला तर अब्दुल समद हा तिथे उभा राहिल्याने त्याला कारची धडक लागली होती.

कारचे चाक छातीवरुन गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या पॅरामाऊंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला एक्झॉन हॉस्पिटल आणि नंतर सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अस्लम मोहम्मद यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून दोन वर्षांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page