वर्क परमीटसह विदेशात नोकरीच्या आमिषाने १.३७ कोटीची फसवणुक

तीस व्यक्तींना गंडा घालणार्‍या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२६
मुंबई, – वर्क परमीटसह विदेशात नोकरीच्या आमिषाने तीस लोकांची एका खाजगी कंपनीने १ कोटी ३७ लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरकेन ओव्हरसीज कंपनीचे मालक आणि संचालक सोनाली गुरुमुख खानचंदानीसह इतर आरोपीविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु होताच आरोपी कंपनीला टाळे लावून पळून गेल्याचे उघडकीस आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांत इतर काही लोका तक्रारीसाठी पुढे येत असल्याने फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आले.

रमेश जिवा बामनिया हे सांताक्रुज येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचा मित्र रफिक शेख याने आरकेन ओव्हरसीज कंपनीबाबत त्याला माहिती दिली होती. ही कंपनीत विदेशात गरजू आणि बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे काम करते. कंपनीकडून अनेकांना वर्क परमीट दिला जातो. मालाड येथील माईंडस्पेस, इन्फिनिटी मॉलसमोरील इजमिमा कॉम्प्लेक्समध्ये कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. त्यामुळे रमेश हा त्याच्या मित्रासोबत तिथे नोकरीविषयी चौकशी करण्यासाठी गेला होता. यावेळी अनिता नावाच्या एका महिलेने त्याला हंगेरी देशात दोन वर्षांच्या वर्क परमीटवर नोकरीसाठी पाठविण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी त्याला चार लाख रुपये द्यावे लागतील. त्यात तीन लाख वर्क परमीट तसेच विदेशात जाण्याचा एक लाख रुपये कमिशनचा समावेश होता. नोकरी मिळाली दिली नाहीतर त्यांना त्यांचे संपूर्ण पेमेंट परत केले जाईल असे सांगितले.

रमेशला नोकरीची गरज होती, त्यात विदेशात नोकरीची संधी मिळत असल्याने त्याने चार लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. चार लाख रुपयांचे पेमेंट दिल्यानंतर त्याला एक पोचपावती देण्यात आली. त्यानंतर त्याला चार ते सहा महिन्यांत हंगेरीला नोकरीसाठी पाठविले जाईल असे सांगण्यात आले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याला नोकरीसाठी विदेशात पाठविण्यात आले नाही. चौकशीनंतर त्याला हंगेरी देशाचे वर्क परमीट बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याला फिनलँड देशात पाठविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र तिथेही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्याने नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र कंपनीने त्याला पैसे परत केले नाही. त्याला दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. याच दरम्यान त्याला आरकेन ओव्हरसीज कंपनीचे मालक आणि कर्मचारी इतर लोकांची फसवणुक करुन कंपनीला टाळे लावून पळून गेल्याची माहिती समजली.

चौकशीदरम्यान मे २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत कंपनीने विदेशात नोकरीसाठी वर्क परमीट आणि नोकरीच्या आमिषाने कंपनीने त्याच्यासह जवळपास तीस लोकांची फसवणुक केली होती. त्यांच्याकडून १ कोटी ३७ लाख ५६ हजार ४०० रुपये घेतले, मात्र त्यापैकी कोणालाही नोकरी मिळवून दिली नाही. या लोकांनी पैशांची मागणी सुरु केल्यांनतर कंपनीचे मालक व संचालक सोनाली खानचंदानीसह इतर आरोपी कंपनी बंद करुन पळून गेले होते.

हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारासह इतरांनी बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी संचालक सोनाली खानचंदानीविरुद्ध नोकरीसह वर्क परमीटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. आतापर्यंत ३१ लोकांची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली असून आगामी काळात आणखीन काहीजण तक्रार करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page