हेव्ही डिपॉझिटच्या २६.८७ लाखांचा अपहार करुन पाचजणांची फसवणुक
एकाच कुटुंबातील पाचजणांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या २६ लाख ८७ हजाराचा अपहार करुन एका तरुणीसह पाचजणांची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील पाचजणांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शहनाज रियाजउद्दीन बक्ष, रियाजउद्दीन इस्लामउद्दीन बक्ष, इस्लामउद्दीन अमीरउद्दीन बक्ष, फरीदा इस्लामउद्दीन बक्ष आणि हुसना फैजल शेख अशी या पाचजणांची नावे आहेत. शहनाज आणि रियाजउद्दीन हे दोघेही पती-पत्नी असून त्यांच्याविरुद्ध गेल्याच आठवड्यात अशाच एका गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पहिल्या गुन्ह्यांत त्यांनी पाचजणांची २२ लाखांची फसवणुक केली होती, या घटनेला एक आठवडा होत नाही तोवर त्यांच्याविरुद्ध आता २६ लाख ८७ हजाराचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
२८ वर्षांची तक्रारदार तरुणी फरहीन मेहमूद सय्यद ही तिच्या वडिल आणि बहिणीसोबत वांद्रे येथे राहत असून ती खाजगी क्लासेस घेते. गेल्या वर्षी तिची शहनाजशी ओळख झाली होती. यावेळी तिच्यासोबत तिचे सासरे इस्लामउद्दीन, सासू फरीदा आणि नणंद हुसना असे तिघेजण होते. तिने तिचा वांद्रे येथील न्यूकांतवाडी, रफिक अपार्टमेंटमध्ये २०८ क्रमांकाचा स्वतच्या मालकीचा एक फ्लॅट असल्याचे सांगितले. तिला तो फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे. तिने तिला हेव्ही डिपॉझिटवर घर देण्याचे आश्वासन दिले. तिने तिला हेव्ही डिपॉझिट दिले किंवा तिला तिथे राहायचे नसेल तर ती दुसर्या भाडेकरुला तिथे ठेवून तिला मासिक भाडे देण्याचे कबुली केले होते.
हा प्रस्तव तिला आवडला होता. चर्चेअंती त्यांच्यात सहा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर रुमचा भाडेतत्त्वावर एक करार झाला होता. ठरल्याप्रमाणे तिने शहनाजच्या बँक खात्यात ३ लाख सहा हजार ट्रान्स्फर केले तर दोन लाख कॅश तर तिचा पती रियाजउद्दीनच्या बँक खात्यात ७४ हजार ट्रान्स्फर करुन वीस हजार कॅश स्वरुपात दिले ला सहा लाख रुपये दिले होते. तिच्यासोबत तिची परिचित अंजुम अली शेख हिच्यांकडून रफिक अपार्टमेंटच्या २११ क्रमांकासाठी फ्लॅटसाठी शहनाजने २ लाख ८७ हजार, पती रियाजउद्दीनने ५० हजार घेतले होते. तसेच दिव्या भास्कर सोनावणे या महिलेकडून रफिक अपार्टमेंटच्या २०६ क्रमांकाच्या फ्लॅटसाठी आठ लाख रुपये, माहरुफ मोहम्मद अली खानकडून साडेसहा लाख रुपये, करीम शरीफ शेख यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले होते.
अशाच प्रकारे जुलै २०२५ ते ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत बक्ष कुटुंबियांनी वेगवेगळ्या फ्लॅटसाठी तक्रारदार तरुणीसह पाचजणांकडून २६ लाख ८७ हजार रुपये हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतले होते. या फ्लॅटची मालकी नसताना त्यांनी ते फ्लॅट त्यांच्या मालकीचे असल्याचे सांगून त्यांच्यासोबत भाडेकरार केला होता. मात्र कोणालाही फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेली हेव्ही डिपॉझिटची रक्कम परत केली नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच फरहीनसह इतर पाचजणांनी वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून बक्ष कुटुंबियांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शहनाज, रियाजउद्दीन, इस्लामउद्दीन, फरीदा बक्ष आणि हुसना शेख या पाचजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात शेहनाज आणि रियाजउद्दीन या पती-पत्नीविरुद्ध अशाच प्रकारे अन्य एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. या दोघांनी रफिक अपार्टमेंटच्या दोन फ्लॅटसाठी एका महिलेसह चौघांकडून सुमारे २२ लाख रुपये घेतले होते.
मात्र त्यांना फ्लॅटचा ताबा न देता त्यांच्याकडून घेतलेल्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन फसवणुक केली होती. या घटनेला एक आठवडा होत नाही तोवर बक्ष कुटुंबियांविरुद्ध अन्य पाचजणांनी वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या पाचजणांनी त्यांना २७ लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. त्यापैकी शहनाजला दिलेल्या २५ लाख ४३ हजार तर रियाजउद्दीनला दिलेल्या १ लाख ४४ हजार असे २६ लाख ८७ हजाराचा समावेश आहे. या गुन्ह्यांत त्यांना इस्लामउद्दीन, फरीदा आणि हुसना शेख यांनी मदत केली होती. त्यामुळे त्यांना या गुन्ह्यांत सहआरोपी कण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.