मुंबई शहरात कार्यरत असलेल्या दहा मुन्नाभाई एमबीबीएसवर कारवाई
कुठलीही वैद्यकीय पदवी-परवाना नसताना रुग्णांवर औषधोपचार सुरु होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – मुंबई शहरातील भांडुप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरिवली आणि दहिसर येथील विविध ठिकाणी खाजगी क्लिनिक थाटून रुग्णावर उपचार करुन त्यांच्याकडून भरमसाठ फी उकाळून सर्वसामान्यांची फसवणुक करणार्या दहा मुन्नाभाई एमबीबीएस बोगस डॉक्टरांवर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीशनर्स कायदा कलमांतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. शेख मोहम्मद अन्वर मोहम्मद अस्लम, नबी हुसैन मोहम्मद फरीद शेख, इम्रान अब्दुल जब्बार खान, दशाशंकर हुबलाल सिंग, जुनैद हश्मातुल्लाह सिद्धीकी, शहाबुद्दीन निजामुद्दीन शेख, नावेद जाहेद खान, राशिद हुसैन अफजल हुसैन शेख, राशिद हुसैन बेग आणि निहाल अराफत शेख अशी या दहा एमबीबीएस मुन्नाभाईंची नावे आहेत. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून अशाच इतर काही बोगस डॉक्टरांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरुद्ध अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाले होते. कुठलीही पदवी आणि परवाना नसताना संबंधित बोगस डॉक्टर विविध ठिकाणी क्लिनिक थाटून रुग्णांवर औषधोपचार करुन त्यांच्याकडून भरमसाठ फी घेत आहे. रुग्णांची फसवणुक करुन त्यांच्या जिवीताशी खेळ करत आहे. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांनी गंभीर दखल घेतली होती. या बोगस डॉक्टरांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानंतर युनिटच्या सातच्या अधिकार्यांनी अशा बोगस डॉक्टरांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. त्यात मुंबईतील विविध परिसरात संबंधित डॉक्टरांनी क्लिनिट थाटून रुग्णांवर उपचार करुन, त्यांना ओैषध देऊन त्यांच्याकडून भरमसाठ फि घेत असल्याचे उघडकीस आले होते.
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे, धनाजी साठे, महेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक अजय गोल्हर, प्रमोद जंगम, अरुण सावंत, तानाजी उबाळे, नार्वेकर, सहाय्यक फौजदार दिपक पवार, पोलीस हवालदार विकास होनमाने, जाधव, विलास राऊत, पाटील, पोलीस शिपाई पाटील, सावर्डेकर, जाधव, महिला पोलीस शिपाई सदाफुले, जाधव, थोकल आदी पथकाने भांडुपच्या संतोष हेल्थ क्लिनिक, विनायक हेल्थ क्लिनिक, जोगेश्वरीतील हमदम दवाखाना, कोहीनूर दवाखाना, बोरिवलीतील अंकुश आयुवैदिक दवाखाना, दहिसर येथील हर्षल हेल्थ केअर क्लिनिक आणि मानखुर्दच्या समर आयुवैदिक दवाखाना आदी ठिकाणी एकच वेळेस कारवाई केली होती.
या कारवाईत पोलिसांनी दहा एमबीबीएस मुन्नाभाईंना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी किंवा वैद्यकीय परवाना नव्हता. तरीही ते सर्वजण स्वतचे क्लिनिक थाटून रुग्णांवर औषधोपचार करुन त्यांच्याकडून भरमसाठ फी घेत होते. त्यांना औषध देत होते. अशा प्रकारे त्यांनी सर्वसामान्यांची फसवणुकीचा धंदा सुरु केला होता.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा मोठ्या प्रमाणात ऍलोपॅथी, आयुवैदिक, युनानी औषधांचा साठा जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या दहाही एमबीबीएस मुन्नाभाईंविरुद्ध कलम ३३, ३६ महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीशनर्स कायद्यार्ंतत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांन किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सातचे अधिकारी तपास करत आहेत.