वेतन मंजुरीसाठी पाच हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपीकाला अटक
नायगाव येथील ल विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – थकीत वेतन बिल मंजुरीसाठी ३५ हजाराची लाचेची मागणी करुन पाच हजाराचा दुसरा हप्ता घेताना नायगाव येथील ल विभागाचे वरिष्ठ लिपीक बद्रीनाथ शिवहरी थोरवे यांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. बद्रीनाथ थोरवे यांना त्यांच्याच कार्यालयात लाचप्रकरणी अटक झाल्याने तिथे उपस्थित इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
३५ वर्षांचे तक्रारदार मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. गेले २९४ दिवस सिक रजेवर होते. सिक रजेवर असल्याने त्यांचे वेतन बंद करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच ते सिक रजेवर पुन्हा कामावर रुजू झाले होते. वरिष्ठांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सीक रजेबाबत खुलासा केला होता. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन त्यांची सिक रजेपैकी २४८ दिवस रजा मंजूर तर उर्वरित विनावेतन करण्यात आली होती. या रजा मंजूर दिवसांचे थकित वेतन बिल बनवून, ट्रेजेरीला पाठवून बिल मंजुर करावे यासाठी नायगाव येथील ल विभागात अर्ज केला होता. यावेळी वरिष्ठ लिपीक बद्रीनाथ थोरवे यांनी त्यांच्याकडे वेतन मंजुरीचा अर्जावर कारवाई करण्यासाठी ३५ हजाराची लाचेची मागणी केली होती.
त्यापैकी दहा हजार रुपये त्यांनी ऑनलाईन घेतले होते. उर्वरित २५ हजारासाठी बद्रीनाथ थोरवे हे त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते. उर्वरित रक्कमेची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. १६ सप्टेंबरला तक्रारदाराकडून तक्रार प्राप्त होताच तची १६ सप्टेंबर आणि ७ ऑक्टोंबर २०२६ रोजी शहानिशा करण्यात आलीहोती. त्यात बद्रीनाथ थोरवे यांनी पूर्वी घेतलेल्या दहा हजाराची कबुली देताना उर्वरित २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
ही लाच दिल्यानंतर त्यांचे वेतन मंजुरीच्या अर्जावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मंगळवारी या अधिकार्यांनी नायगाव येथील ल विभागात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदराकडून लाचेचा पाच हजाराचा दुसरा हप्ता घेताना बद्रीनाथ थोरवे यांना या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी लाचेची रक्कमेसह त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. या कारवाईनंतर त्यांच्या राहत्या घरी दुसर्या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईचा तपशील समजू शकला नाही.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र दिवे, पोलीस निरीक्षक जगदीश मोरे, पोलीस हवालदार चव्हाण, मठपती, गावडे, महिला पोलीस हवालदार गोले, पोलीस शिपाई सोनावणे, रेडेकर, गारळे, पोलीस शिपाई चालक साबळे यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले.