गुन्ह्यांत मदतीसाठी लाच घेणार्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक
आठ लाखांची मागणी करुन तीन लाख घेताना एसीबीची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२६
पुणे, – गुन्ह्यांत मदत करण्यासाठी लाच घेणार्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला पिंपरी-चिंचवड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. चैताली बाळासाहेब गपाट असे या उपनिरीक्षक महिलेचे नाव असून ती दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. आठ लाखांची लाचेची मागणी करुन तीन लाख रुपये घेताना तिच्यावर एसीबीच्या अधिकार्यांनी कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यातच चैताली गपाट हिला लाचप्रकरणी अटक झाल्याचे समजताच दिघी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार पिंपरी-चिंचवडचे रहिवाशी असून त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. याच गुन्ह्यांचा तपास नंतर पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट यांना देण्यात आला होता. याच गुन्ह्यांत बी फायनल करण्यासाठी तिने तक्रारदारांना मदत केली होती. तसेच भविष्यात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, गुन्ह्यांत मदत करण्यासाठी तिने तक्रारदाराकडे आठ लाखांची लाचेची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने तिने तिला लाचेची रक्कम कमी करण्याची विनंती केली होती.
ही लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांनी तिच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चैताली गपाट हिने आठ लाखांची मागणी करुन तीन लाखांची लाच घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या पथकाने पोलीस ठाण्याजवळ सापळा लावला होता.
बुधवारी १५ जुलैला सायंकाळी पावणेआठ वाजता तक्रारदाराकडून तीन लाखांची लाचेची रक्कम घेताना तिला या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. तिच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि मिथुन म्हात्रे व अन्य पोलीस पथकाने केली.